उरण : जेएनपीटी बंदरातील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून अनेक सूचना करण्यात आल्या असून, गुरुवारपासून गव्हाण ते दिघोडे या मार्गावरील अवघड वाहनांवर उरणच्या वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर दररोज कोंडी होत असून कंटेनर वाहनांच्या तीन तीन रांगा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी या कोंडीमुळे दिघोडे येथे एका दुचाकीस्वाराचा अपघातही झाला होता.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जेएनपीटी, सिडको व वाहतूक विभागाने संयुक्तरीत्या या समस्येवर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तर नवी मुंबईच्या वाहतूक विभागाने २७ सप्टेंबरपासून सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत कंटेनर वाहतुकीला बंदी घातली आहे. गुरुवारी गव्हाण, दिघोड, वेश्वी, जांभूळपाडा, वाढधोंडी खिंड या मार्गावर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांवर उरणच्या वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
उरण वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी अशोक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या मार्गावरील वाहनांवर केली जाणारी कारवाई ही आवश्यक असून त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत चिरनेर येथील प्रवासी जीवन केणी यांनी व्यक्त केले आहे.