नवी मुंबईतील सी उड स्थित ग्रँट सेंट्रल मॉलच्या माथाडी काम कंत्राटावरून शनिवारी रात्री दोन संघटनांमधील वादाचे रुपांतर रस्त्यावर सिनेस्टाईल हाणामारीत झाले. यात एका संघटनेच्या नेत्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याने, तो गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर आरोपी फरार आहेत.
आरोपींमध्ये मिलिंद भोईर, मनोहर नाईक आणि त्यांचे चार ते पाच साथीदारांचा समावेश आहे. सी उड येथील ग्रँट सेंट्रल मॉल असून मोठ्या प्रमाणात माल चढवणे उतरवण्यासाठी माथाडी कामगार लागतात याच कामाच्या कंत्राटावरून विविध माथाडी संघटनेत वाद होतात, करोना काळात हाताला काम नसल्याने जे मिळेल त्या कामासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे, त्याचा प्रत्यय शनिवारी आला.
अशाच एका संघटनेचा नेता ब्रिजेश पाटील याला ग्रँट सेंट्रल मॉल समोर भर रस्त्यात मिलिंद भोईर आणि मनोहर नाईक यांच्या सह चार पाच साथीदारांनी गाठले व काही कळण्याच्या आत त्याच्यावर कोयता, गुप्तीने वार केले. ज्यामध्ये ब्रिजेश पाटील गंभीर जखमी असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यावर सर्व आरोपी पळून गेले आहेत. या बाबत एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.
यातील आरोपी व ज्याला मारहाण झाली तो दोघांची गुन्हेगारी पर्शवभूमी असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.