वाशीमध्ये झाडांवर खिळे ठोकून, दिशादर्शक फलक झाकून नेत्यांचे स्वागत
नवी मुंबई : वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (एनएमएसए) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या परिवारसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या परिसराचे विद्रूपीकरण आणि पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यासाठी वाशी सेक्टर ४, ६, ७, ८, ९ परिसरात सोमवारी फलकबाजीला ऊत आला होता. फलक लावण्यासाठी अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्यांना खिळे ठोकण्यात आले होते तर, अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांच्या खांबांना फलक लावण्यात आले होते.
सुशिक्षित, उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसराच्या विद्रूपीकरणाबद्दल तसेच झाडांना इजा करण्याच्या प्रयत्नांबद्दल येथील नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच असंख्य नागरिकांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पक्षातील ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्याकडेही लघुसंदेशाद्वारे याबाबत आक्षेप नोंदवल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्याचे सोमवारी ‘एनएमएसए’ येथे करण्यात आले होते. त्यासाठी वाशीतील शिवाजी चौकापासून अगदी ‘एनएमएसए’पर्यंत फलकबाजी करण्यात आली होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहरातील पदाधिकारी यांच्यासह नवी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या स्वागतासाठी फलक लावले होते. त्यामुळे सोमवारी या परिसराला अवकळा आली होती. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘शहरात विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम होतात. येत्या काळात त्यात आणखी भर पडेल. मात्र, झाडांना खिळे ठोकून फलक लावणे चुकीचे असून वृक्ष प्राधिकरणाने याबाबत कारवाई करण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. ‘एनएमएसए’जवळच असलेल्या साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनीही राजकीय पक्षांनी नियमावलीचे भान राखले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालिकेकडे कारवाईची मागणी
फलकबाजीबद्दल स्थानिक नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे कार्यक्रम आटोपताच हे फलक तातडीने हटवण्यात आले. मात्र, महापालिकेने आधीच या विद्रूपीकरणावर कारवाई करण्याची गरज होती, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे तसेच दिवाळीच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी राजकीय फलकबाजी जोरात सुरू आहे. त्यासाठी महत्त्वाचे चौक तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला मनमानी पद्धतीने फलक लावण्यात येत आहेत. यापैकी अनेक फलकांसाठी पालिकेची अधिकृत परवानगीही घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. मात्र, तरीही त्यावर पालिकेकडून कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.