पनवेल : एका महिन्याचे वीज देयक थकल्यास वीज खंडित करण्याची तत्परता दाखवणाऱ्या महावितरणला गेली अनेक वर्षे उघड्या वीज पेट्या व वीज वाहिन्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आमचे जीव गेल्यावर महावितरणचे अधिकारी कर्तव्य बजावणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
पनवेल विभागात महावितरण कंपनीचे ४ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून सुमारे ७६ कोटींपेक्षा अधिकच्या वीज देयकांची रक्कम महावितरण कंपनी करते. या व्यतिरिक्त वाणिज्य वीज वापर करणाऱ्यांची संख्या पनवेलमध्ये मोठी आहे. या ग्राहकांकडून देयक वसुलीसाठी महावितरण तत्परता दाखवत आहे. एका महिन्याचे देयके थकली तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र शहरात महावितरणच्या वीज पेट्या अनेक ठिकाणी उघड्या आहेत तर वीज वाहिन्यांचीही दुरवस्था झाली आहे.
तळोजा मजकूर गावातील विसर्जन घाट आणि शिवमंदिरासमोर रोहित्रालगत असणारी उघडी वीजपेटी महावितरण कंपनीचे अधिकारी कधी बंद करणार असा प्रश्न याच गावातील ग्रामस्थ आणि ज्येष्ठ कामगार नेते बी. के. राजे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे मोठे अपघात होण्याचा धोकाही त्यांनी वर्तवला आहे.