Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या अनेक वर्षापासून डेडलाईनवर डेडलाईन देणारी सिडको आता अंतिम टप्यात आली आहे. सिडकोने अखेर विमानतळाची अंतीम तारीख ठरवली असून तीन वर्षानंतर नवी मुंबईकरांना विमान हवेत झेपावताना पहायला मिळणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये पहिले विमान उडणार आहे.
विमानतळासंबंधी सिडकोचे एम.डी. संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाईन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी 2024 साली पहिले विमान उडण्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई आणि पनवेल च्या मध्यभागी जवळपास 24 हजार कोटी खर्च करत हे विमानतळ उभे राहत आहे. वर्षांला 60 लाख प्रवाशी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करणार आहेत.
विमानतळाच्या काही अंतरावर जेएनपीटी बंदर असल्याने याचा मोठा फायदा विमानतळाला होणार आहे. त्यातून वर्षाला 1 लाख 50 हजार मेट्रिक टन कार्गो देश विदेशात जाणार आहे. या विमानतळामुळे 1 लाख थेट तर 2.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारनं देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावं, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मत याआधी मुंबई उच्च न्यायालयाने केलं होतं. नवी मुंबईतील विमानतळाला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार दि.बा.पाटील यांचं नाव द्यावं यासाठी 25 हजारांच्या संख्येने स्थानिक नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन केले. यावेळी कोरोनाशी लढा देताना पाळाव्या लागणाऱ्या सर्व खबरदाऱ्यांना तिलांजली देण्यात आली होती.