नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत द्राक्षांची आवक अल्पप्रमाणात सुरू झाली असून मागील आठवडय़ात पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
दावण्या, घडकुज, मणीगळ, करपा या रोगांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या दररोज एक टेम्पो आवक होत आहे. मागील वर्षी हे प्रमाण ४ ते ५ गाडय़ा इतके होते. त्यामुळे यंदा हंगाम एक महिना उशिराने सुरू होणार आहे.
१५ डिसेंबर पासून एपीएमसी बाजारात मोठय़ा प्रमाणावर द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र नोव्हेंबरमध्ये पडलेल्या पावसाने छाटणीला आलेल्या उत्पादनावर पाणी फेरले आहे. एपीएमसी बाजारात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द्राक्षाची आवक सुरू होते. तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. १५ एप्रिलपर्यंत हा हंगाम सुरू असतो. बारामती, सांगली येथून द्राक्ष आवक होते, मात्र सध्या बाजारात बारामतीहून आवक होत आहे. सांगली भागात सध्या फुलोरावस्थेत असलेल्या द्राक्षबागांत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठय़ा प्रमाणात मणीगळ, घडामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घडकुज झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे ३०-४० टक्के उत्पादन खराब झाले आहे. पाच किलोला ४०० ते ७०० रुपये बाजारभाव आहेत.
मागील आठवडय़ात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांवर परिणाम झाला आहे. पावसाने मणीगळ, घडकुज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनाला ३०-४० टक्क्यांचा फटका बसला आहे.
– नंदकुमार भीमराव पवार, द्राक्ष बागायतदार, सांगली