नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यावर प्रकल्पग्रस्त ठाम असून वेळ पडल्यास सिडकोत घुसून आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी दिला.
करोनाच्या परिस्थितीमुळे काही काळ आंदोलन शांत होते, म्हणून विरोधक विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे आंदोलन थांबले असा आरोप करत होते. परंतु दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आंदोलन कधीच थांबले नाही व त्यांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय ते थांबणारही नाही, असे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात मंगळवारी झालेल्या मेळाव्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या लढय़ाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी जाहीर केले. लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भूषण पाटील, राजेश पाटील, मनोहर पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, दशरथ भगत व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, नवी मुंबई सर्वांची आहे. पण प्रत्येकाची अस्मिता महत्त्वाची आहे. आमची अस्मिता दि.बा. पाटील आहेत. त्यांचे नाव विमानतळाला दिलेच पाहिजे ही येथील प्रत्येक नवी मुंबईकरांची इच्छा आहे. त्यांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास सिडकोत घुसून आंदोलन करण्याचा इशारा रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिला. तर दशरथ भगत यांनी १३ जानेवारीला दि.बा. पाटील यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याबाबतची माहिती १ जानेवारीला देण्यात येईल. तोपर्यंत विभागवार कृती समितीच्या वतीने विभागवार भूमिपुत्र मेळावे आयोजित केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
पोकळ आश्वासने
दि.बा. पाटील यांनी १९७० पासून सिडको आली तेंव्हापासून संघर्ष केला. मात्र सिडको फक्त आश्वासने देत आली. जमिनी घेतल्या पण १२.५० टक्के, २२.५० टक्के फक्त कागदावर मिळालेत. आंदोलनाच्या रेटय़ाने सरकारला थांबावे लागले आहे, आशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.