नवी मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नाताळ सणासाठी बाजारपेठ सजली आहे. इतर सणांमध्ये देशी बनावटीचे साहित्य खरेदीसाठी अधिक होते. मात्र नाताळच्या सजावटी साहित्यामध्ये चीनी वस्तू अधिक दिसत आहे.
दरातही २० टक्के वाढ झाली आहे. बाजारात विविध साहित्य खरेदीसाठी रेलचेल सुरू झाली आहे. दुकानांबाहेर उभे केलेले सांताक्लॉजचे पुतळे, मुखवटे आकर्षित करीत आहेत. सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत. ट्री सजावटीकरिता विविध प्रकार उपलब्ध आहेत.
यात ख्रिसमस ट्री, लुकलुकणारे दिवे, चकाकणाऱ्या चांदण्या, झुंबर, मेटॅलिक दिवे, पोस्टर्स, स्नो मॅन, स्टिकर्स, बॅनर्स, बेल्स, एंजल्स, बेल्स बॉल, लहान मोठय़ा आकाराचे रंगीत बॉल्स, विविध आकारांतील रंगीत मेणबत्त्या, फुलांसाठीचे आकर्षक स्टॅंड, येशू ख्रिस्त जन्मसोहळ्याचे आकर्षक देखावे, सांताक्लॉज, बालचमूंसाठी लाल सांता कॅप, मुखपट्टी, कपडे, प्लॅस्टिक ट्री, चॉकलेट, स्टार, ड्रम, चेरी, भेटवस्तू यांचा समावेश आहे. सांताक्लॉजच्या मुखपट्टी ५० ते १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. लहानातली लहान ख्रिसमस ट्री १०० ते ८०० रुपये, तर अधिक आकर्षक व उंचीने मोठे ट्री २ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. सजावटी साहित्य ५० ते ५०० रुपयांपासून उपलब्ध आहे. सांताक्लॉजचे लाल कपडे, टोप्या, डेकोरेटिव्ह कॅण्डलसेट, जेलीटेप, स्टॅंड विथ कॅण्डल, सुवासिक कॅण्डल, मदर मेरी, जीझस, ख्रिसमस ट्री, विविध आकारांच्या शोभीवंत मूर्ती, चॉकलेट्सचे डबे, आकर्षक खेळणी विक्रीसाठी ठेवली आहेत. बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या सजावटी साहित्यामध्ये थर्मासचे चेंडू, संता हे फक्त उपलब्ध आहेत. मुलांना देण्यासाठी पालकांची ‘गिफ्ट‘ खरेदी सुरू झालेली आहे.
बाजारात देशीपेक्षा विदेशी चीनी वस्तू अधिक आहेत. यावर्षी शाळा बंद असल्याने या सजावट साहित्यांना मागणी कमी आहे. तर यंदा वस्तूमध्ये २० टक्के दरवाढ झाली आहे.
-लवकुश सिंग, विक्रेता, वाशी