नवी मुंबई : नववर्षांच्या पूर्व संध्येला नवी मुंबई पोलिसांनी २ कोटी ५३ लाख ७० हजार ९०० रुपयांचे एमडी या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. कलीमरफिर खामकर, जकीअफरोज पिट्टू आणि सुभाष पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी एमडी हा अमली पदार्थ बनविण्यासाठी अलिबाग येथील पोयनाड येथे कारखाना सुरू केला होता. आरोपी सुभाष पाटील हा बी.एस.सी. केमिकलचा विद्यार्थी असल्याचा फायदा त्याला झाला.
हा कारखाना काही दिवसांपूर्वी त्याने सुरू केला. मात्र पहिल्या वेळेस त्याचे रासायनिक गणित चुकले, परंतु दुसऱ्या वेळेस त्याला एमडी अमली पदार्थ तयार करण्यात यश मिळाले. सुभाष हा केमिकलचा विद्यार्थी असल्याने त्याला रसायनशास्त्राचे चांगले ज्ञान होते, तसेच इंटरनेट वा अन्य साधनांनी त्याने याचे समीकरण जुळवले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सदर कारखाना बंद करण्यात आला आहे.
पनवेल येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले व त्याची पोलिसी खाक्याने चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून १ कोटी रुपयांची एमडी पावडर, साडेतीन लाखांची कार, ९०० रुपयांची रोकड, तर पिट्ट याच्याकडून ५० लाखांची एमडी पावडर तसेच पाटील याच्याकडून १ कोटींची एमडी पावडर असा एकूण २ कोटी ५३ लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.