नवी मुंबई : नवी मुंबईकरांना (New Mumbai) लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एमएच 43 (MH 43) वाहनांना वाशी व एरोली टोल माफ होऊ शकतो. कारण तशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत सातत्याने आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे या मागणीसंदर्भात मंदा म्हात्रे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क साधला असता, त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच लवकरच कारवाई करू असे आश्वासन देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे आता लवकरच नवी मुंबईकरांचा टोल माफ होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, एमएच 43 वाहनांना वाशी व एरोली टोलमधून सुटका व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लवकरच प्रस्तावावर कारवाई करण्याचे देखील अश्वासन दिल्याचे म्हात्रे म्हणाल्या.
दरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश आल्यास नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या वाहनचालकांना वाशी ऐरोली अशा दोनही ठिकाणी टोला भरावा लागतो, त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसतो. टोल माफ झाल्यास त्यांचा फायदा होणार आहे.