नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त नाव देण्यासही कृती समितीने विरोध दर्शवला आहे. तसेच, विमानतळाला दि.बा.पाटील यांचे स्पष्टपणे नाव दिले जावे अशी मागणी देखील करण्यात आली असून, २४ तारखेला आंदोलनही केले जाणार आहे.
”ही संयुक्त नाव देण्याची पद्धत ही आजपर्यंत कुठेही आम्हाला काही दिसत नाही. त्यामुळे जर तरचे प्रश्न नाहीत आणि अशाप्रकारच्या अनोख्या काही गोष्टी होतील, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आमचं मत आहे की दि.बा. पाटील यांचे स्पष्टपणे नाव देण्यात यावं. उगाच वेगळे प्रयत्न करून नयेत अशी आमची मागणी आहे.” असं मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलं. आहे.
तसेच, माध्यमांशी बोलातना त्यांनी सांगितले की, ”इथे आलेला माणूस तो कोणत्या जिल्ह्यातील आहे किंवा कोणत्या प्रांतामधील आहे तोपण विचार करणार नाही. जो माणूस इथे दहा-पंधरा वर्षे राहिलेला आहे तो इथला आहे. त्यांना दि.बा. पाटील यांच्या कामाची माहिती झालेली आहे. त्यामुळे दि.बा. पाटील हे ज्या गोरगरिबांसाठी लढले. त्यांनी प्रांत भेद, जिल्हा भेद केलेला नाही. त्यामुळे सर्व लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे २४ तारखेचं आंदोलन हे जोरात व लाक्षणिक असेल. सरकारला अनेक संधी आम्ही दिल्या आणि यापुढे देखील आम्ही संधी देणार आहोत. पण किती संधी द्यायच्या, आता आमचा वेग वाढत आहे. आम्हाला जास्त काळ थांबायचं नाही.”