उरण : कचराभूमीला पर्यायी जागा नसल्याने शहरातील कचराकोंडी सुरू असून उरण तालुक्यातील मोठया ग्रामपंचायतींतही हा प्रश्न गंभीर झाला आहे. कचरा टाकण्यास हक्काची कचराभूमी नसल्याने रस्ते, खारफुटी क्षेत्र व समुद्र किनारेही कचऱ्याने व्यापलेले दिसत आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासन, सिडको यांनी दखल घेत कचरा समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.
उरण तालुका हा नवी मुंबई, मुंबई शहराच्या शेजारी असल्याने तसेच औद्योगिक विकासाबरोबरच झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. तालुक्यात ३५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती आहेत. यापैकी एकाही ग्रामपंचायतीकडे कचराभूमी नाही. तर उरण नगरपालिकेकडे असलेल्या कचराभूमीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने येथील कचराभूमी बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उरण शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर झाला आहे. सध्या उरण शहरात तयार होणार कचरा हा सिडकोच्या पनवेल येथील चाळ गावातील कचराभूमीवर टाकण्यात येत आहे. मात्र शहरात निर्माण होणारा पूर्ण कचरा उतचला जात नाही. उरण तालुक्यातील बहूतांशी ग्रामपंचायतीकडून सध्या गावाच्या शेजारील तसेच हम रस्त्याच्याकडेला गावातील कचरा टाकून तो जाळला जात आहे. त्यामुळे धुरासह दुर्गधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
योजना कागदावरच
उरण पंचायत समितीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी योजनांवर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ओएनजीसी, जेएनपीटी व सिडकोकडे मागणी करूनही त्याकडे या आस्थापनांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
खारफुटींचे नुकसान
तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरात खाडीमुळे खारफुटी क्षेत्र आहे. या क्षेत्रात गावातील कचरा टाकून तो जाळला जात आहे. त्यामुळे खारफुटीही जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत. उरणमध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यांवरही सध्या कचरा दिसत आहे.
उरण तालुक्यातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून पंचायत समितीकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ग्रामपंचायतीनी जिल्हाधिकाऱ्याकडे कचराभूमीची मागणी करण्याची सूचना दिल्या आहेत. मात्र काही ठरावीक ग्रामपंचायतींनी मागणी केली आहे.
– नीलम गाडे, गटविकास अधिकारी, उरण