उरण : येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अनेक हरित प्रकल्प राबवीत असून देशातील बंदरासाठीच्या राबविल्या जात असलेल्या हरित बंदर उपक्रमात जेएनपीटी बंदर हरित बंदराचा दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करील, असा विश्वास बंदर व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शनिवार, २९ जानेवारी रोजी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी देशात हरित बंदरे आणि हरित जहाज वाहतुकीच्या विकासासाठी मेरिटाइम इंडिया व्हिजन २०३०ह्ण नुसार राबविण्यात येत असलेल्या विविध हरित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सर्व प्रमुख बंदरे, सीएसएल आणि आयडब्ल्यूएआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीच्या हरित बंदर उपक्रमांविषयी माहिती दिली. ‘‘जेएनपीटीने बंदराच्या सर्व क्रियाकलापांचा समावेश असलेला एक कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये माल हाताळणी, साठवण, निर्गमन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर अनेक कार्याचा समावेश आहे. जेएनपीटीमध्ये टग आणि बंदर नौकांना बंदरामध्येच किनाऱ्यावर वीजपुरवठा केला जातो, त्याचबरोबर कंटेनर हाताळणीसाठी ई-आरटीजीसीचा उपयोग यासारखे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवितो. आम्ही जेएनपीटीशी संबंधित विद्युत वाहनांवर सौर पॅनेल बसविले आहेत. जेएनपीटीने माल हाताळणी, साठवणूक, निर्गमन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर अनेक क्रियाकलापांसह बंदरातील सर्व कार्याचा समावेश असलेला एक कृती आराखडा तयार केला आहे.’’ मेरिटाइम इंडिया व्हिजन २०३० अंतर्गत, आम्ही जेएनपीटीमध्ये ६० टक्के अक्षय ऊर्जेचा उपयोग, तसेच पर्यावरण अनुकूल विविध प्रकारच्या इंधनाचा (सीएनजी/विद्युत/एलएनजी) उपयोग, किनारा ऊर्जा आपूर्ती, एलएनजी बंकिरग, ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट विद्युत व्यवस्था, ग्रीन बेल्ट कव्हर, जलसंधारण/सांडपाणी प्रक्रिया, २.५ एमडब्ल्यूपी सौर संयंत्र स्थापित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
जेएनपीटीकडून ५६ लाख कंटेनरची हाताळणी
२०२१ मध्ये जेएनपीटी बंदरात एकूण ५.६३ दशलक्ष टीईयू (५,६३१,९४९ टीईयू) कंटेनर वाहतूक हाताळणी झाली जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २५.८६ टक्के अधिक आहे. आतापर्यंतची एका वर्षांत हाताळलेली ही सर्वाधिक वाहतूक आहे. जेएनपीटीच्या या कामगिरीबद्दल जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी, अधिकारी व भागधारकांचे अभिनंदन केले. या वर्षी, जेएनपीटीने किनारपट्टीवरील मालवाहतुकीस चालना देण्यासाठी ‘सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत एक नवीन समर्पित कोस्टल बर्थ तयार केला आहे. या धक्क्यावर नुकतेच प्रायोगिक तत्त्वावर मालहाताळणीसुद्धा सुरू केली आहे. जेएनपीटीमध्ये एक अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) सुरू करण्यात आहे. तसेच फॅक्टरी सीलबंद निर्यात कंटेनर्ससाठी कस्टम तपासणी सुविधा तयार करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
जेएनपीटीकडे एकूण सुमारे ३४०२ हेक्टर जमीन उपलब्ध आहे, त्यापैकी ११४७ हेक्टर क्षेत्र (३४%) हरित आच्छादनाखाली आहे. त्यामध्ये खारफुटीचाही समावेश आहे. बंदराच्या परिसंस्थेत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वनस्पती व जीवजंतू आहेत. बंदर स्तरावर जागतिक हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आम्ही ‘‘हरित बंदर दर्जा’’ (ग्रीन पोर्ट स्टेटस्) प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.