माजी नगरसेवकांसह इच्छुकांची उत्सुकता शिगेला; १२२ सदस्यांच्या ४१ प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार
नवी मुंबई : निवडणुकांच्या डावपेचांमधील महत्त्वाचा भाग समजला जाणाऱ्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. प्रभागांच्या प्रारूपावरच आरोप प्रत्यारोप झाल्याने या रचनेकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे ही निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या एकूण १११ प्रभागांत वाढ होते. १२२ प्रभाग झाले आहेत. त्यासाठी १२२ प्रभागांचे ४१ प्रभाग तयार केले जाणार आहेत.
करोनामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्याने गेली दोन वर्षे पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यात नवी मुंबईत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यात भर म्हणजे राज्य सरकारने बहुसदस्यीय पद्धती आणल्याने शहरातील प्रभागांची संपूर्ण रचनाच बदलणार आहे. त्यामुळे मंगळवारी जाहीर होणाऱ्या प्रभागरचनेकडे लक्ष लागून आहे. वेगवेगळय़ा राजकीय पक्षांच्या बालेकिल्ल्यांमध्ये किती प्रभाग वाढले, किती कमी झाले याशिवाय प्रभागांची झालेली मोडतोड, नवी रचना यासंबंधीचे सविस्तर चित्र यानिमित्ताने स्पष्ट होणार असून राजकीय रणधुमाळी तसेच डावपेचांना यानिमित्ताने नव्याने सुरुवात होणार आहे.
नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० रोजी होणार होती. त्याची सर्व प्रशासकीय व निवडणूक तयारी झाली होती मात्र त्याचवेळी मार्चमध्ये करोनाची साथ देशात पसरू लागल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पालिकेतील १२२ नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत ९ एप्रिल रोजी संपल्याने राज्य सरकारच्या वतीने पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. आयुक्त यांनाच प्रशासकीय जबाबदारी देण्यात आल्याने माजी आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्यानंतर विद्यामान आयुक्त अभिजीत बांगर हे प्रशासक म्हणून कारभार पाहात आहेत. करोनाच्या जागतिक संकटामुळे हा प्रशासकीय कालावधी दोन वर्षे सुरू आहे. एखाद्या शासकीय व निमशासकीय संस्थेवर एक वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमणे योग्य नाही असे मत विधितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबईत करोनाची तिसरी लाट बऱ्यापैकी आटोक्यात आली असून सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाने मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या १२२ प्रभागांची रचना वाशी येथील भावे नाटय़गृहात जाहीर होणार आहे. बहुसदस्यीय प्रभागरचनेपूर्वी महापालिका प्रशासनाने प्रभागरचना व मतदार याद्या जाहीर केल्या होत्या. मात्र त्यावर ३ हजारांहून अधिक हरकती व सूचना आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी प्रसिध्द होणाऱ्या प्रभागरचनेवर किती हरकती सूचना घेतल्या जाणार याबाबतही उत्सुकता आहे. नवी प्रभाग रचना महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांना पूरक झाली आहे असा आरोप भाजपचे स्थानिक नेते करीत आहेत तर ही रचना पालिकेत गेली २५ वर्षे सत्ता असलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या मर्जीप्रमाणे झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते यांनी यापूर्वीच केला आहे. त्यामुळे प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात चित्र समोर येणार आहे.
प्रभागरचना येथे उपलब्ध
स्वतंत्र नकाशे
प्रभागरचनेत ४१ पॅनले होणार असून प्रत्येक पॅनेलची हद्द नमूद करण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांचे आरक्षण जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबई महापालिका निवडणुकसाठी प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालये व पालिकेच्या संकेतस्थळावर ही रचना पाहता येणार आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त