नवी मुंबई : थंडीत मटारसह सर्वाधिक मागणी वाढते ती फ्लॉवर म्हणजेच फुलकोबीची. यंदाच्या रब्बी हंगामात राज्यात पिवळय़ा आणि जांभळय़ा रंगाच्या फ्लॉवरची लागवड झाली असून मुंबईच्या बाजारात पहिल्यांदाच या विदेशी प्रजातींच्या फुलकोबीची आवक झाली आहे.
एपीएमसी बाजारात शनिवारी नाशिकमधून दोन हजार किलो ‘करोटेना’ आणि ‘वॅलेंटेना’ या प्रजातीचा फ्लॉवर आला. अ जीवनसत्वाने युक्त असलेला हा फुलकोबी कर्करोगावरील उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
इटलीत फुलकोबीचे उत्पादन १६व्या शतकात घेतले जाऊ लागले. त्यानंतर फ्रान्स व नंतर आशिया खंडात त्याचा प्रसार झाला. देशात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, आसाम, हरयाणा, या राज्यांत फुलकोबीचे उत्पादन घेतले जाते. यंदा नाशिक येथील वासोळमध्ये हेमंत देसले या शेतकऱ्याने करोटेना म्हणजे पिवळसर आणि वॅलेंटेना म्हणजे जांभळय़ा फ्लॉवरची लागवड केली. त्यांच्याकडून मुंबईत पहिल्यांदाच या फुलकोबीची विक्री करण्यात आली. पहिल्याच दिवशी एक हजार किलो फुलकोबी किरकोळ बाजारात विक्रीस निघाला असून ग्राहक त्याला कशी पसंती देतात, याकडे उत्पादक आणि विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.
वेगळे काय? फुलकोबीचा सर्वाधिक ज्ञात आणि सेवन केला जाणारा प्रकार म्हणजे पांढरा फ्लॉवर. हिरव्या रंगाचा फ्लॉवरसारखा ब्रोकोली हा प्रकार गेल्या काही वर्षांत रुजला आहे. आता जांभळय़ा आणि पिवळय़ा फ्लॉवरची आवक झाली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये प्रामुख्याने या रंगांच्या फ्लॉवरची लागवड होते. देशात बिहारमध्ये सर्वात पहिले त्यांची लागवड झाली.
महत्त्व.. आरोग्याच्या दृष्टीने फ्लॉवर अतिशय हितकारक असून
अ आणि ब जीवनसत्त्वांचे प्रमाण त्यात अधिक असते. वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेह झालेल्यांसाठी ही भाजी हितकारक असते. पिवळा आणि जांभळा फ्लॉवर कर्करोगावर उपयुक्त असतो, असे व्यापारी श्रेयस जाधव यांनी सांगितले.
या फुलकोबीची उपयुक्तता ओळखून त्याचे बियाणे मागविले आणि नाशिकमध्ये त्यांची लागवड केली. त्यातून आलेले पहिले उत्पादन एपीएमसीमध्ये विक्रीस पाठविण्यात आले आहे. – हेमंत देसले, फ्लॉवर उत्पादक