रवी खरात, नवी मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हिडीओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली. या घटने प्रकरणी शिवसेनेचे बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या 8 समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ करणे व धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून जोर लावला जातोय. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचं लक्ष नवी मुंबई महापालिकेवर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक हे देखील उपस्थितीत होते. नेमक्या याच मेळाव्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक भारती कोळी समर्थकांसह उपस्थित राहिल्या होत्या. भारती कोळी या शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. विशेष बाब म्हणजे भारती कोळी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता.
भारती कोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार स्वीकारल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. यामुळं शिवसेना विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी या प्रकाराचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला होता.
बेलापूर विभागाचे विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी भारती कोळी भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ वरिष्ठांना पाठवले होते. नेमक्या याच बाबीमुळं संतप्त झालेल्या भारती कोळी यांनी समर्थकांसह प्रकाश आमटे यांना मारहाण केली. युवासेनेच्या कार्यक्रमात देखील युवासैनिकांमध्ये मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.