आदित्य ठाकरे! राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि युवा सेनेचे प्रमुख... अचानक इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या आलेल्या आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवासही असाच सुरू झाला.
कुणालाही विश्वास बसत नसताना आदित्य ठाकरे अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि निवडूनही आले.
येथूनच त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. पण, आधीची वाटचालही दखल घेण्यासारखीच आहे.
सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या जागी युवा सेनेची स्थापन केली.
वर्ष २०१० मध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. याच दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि आदित्य ठाकरेंकडे याची जबाबदारी सोपवली.
युवा सेनेच्या कामानिमित्ताने आदित्य ठाकरेंचा सक्रिय राजकारणापूर्वीचा प्रवास सुरू झाला.
त्यानंतर ऑक्टोबर २०१२मध्ये भावूक आवाजात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला आवाहन केलं. 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या.' बाळासाहेबांनी ही घोषणा केली, तेव्हा आदित्य ठाकरेंचं वय होत फक्त २२ वर्ष! तेव्हा त्यांच्याकडे युवा सेनेचे अध्यक्षपदाची जबाबदारी होती.
आता ते ३० वर्षांचे आहेत आणि शिवसेनेत महत्त्वाचे नेते बनले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व जबाबदारी आली. त्यानंतर आदित्य हळूहळू राजकारणात जास्त सक्रिय होत गेले.
२०१४ च्या निवडणुकीनंतर आणि आदित्य ठाकरेंनी भूमिका मांडताना दिसू लागले.
त्यांनी निवडक मुद्द्यांवर आंदोलनं असतील किंवा आशीवार्द यात्रा... आदित्य ठाकरेंनी लोकांमध्ये मिसळण्यास सुरूवात केली.
वर्ष होतं २०१०. रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाला विरोध करत त्याच्या प्रती जाळून आदित्य ठाकरेंनी पहिलं आंदोलन केलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
युवा सेनेचं नेतृत्व करताना आदित्य ठाकरे सक्रिय होत गेले, तसा त्याचा परिणाम शिवसेनेच्या धोरणावरही झालेला दिसला.
त्यांचं नेतृत्व शहरकेंद्री असल्याची टीका होत गेली. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातही दौरे करण्यावरही लक्ष दिलं. त्यांची जन आशीर्वाद यात्रा काढली होती.
मुंबईतील आणि महापालिकेतील अनेक धोरणांवर आदित्य ठाकरे यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी मुंबईतील नाईट लाईफ सुरू करण्याचा पाठपुरावा केला. ते सुरूही केलं. त्याचबरोबर ते जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यासाठी देखील आग्रह धरला.
मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.
'व्हॅलेंटाईन डे'ला शिवसेनेचा कडाडून विरोध होता. आदित्या यांच्या प्रवेशानंतर हा विरोध मावळून गेला. तरुणांपर्यंत शिवसेना घेऊन जाण्यासाठी काही धोरणं बदलण्याची गरज असल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेनेनं त्या गोष्टी बाद केल्या.
२०१४ च्या निवडणुका होण्याआधीपासून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं गेलं. मात्र, ठाकरे घराणं राजकारणाबाहेरून सूत्रं सांभाळणारं असल्यानं त्यावरून बऱ्याच शंकाही उपस्थित होत गेल्या.
पण, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी काठावरून राजकारण न करता निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली.
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. या विजयाबरोबरच आदित्य ठाकरे ठाकरे घराण्यातील पहिले आमदार झाले.
(सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)