बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी जाणून घेऊ या. ‘कूली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अशी घटणा घडली होती की त्यावेळी बाळासाहेबांमुळे अमिताभ यांचा जीव वाचला होता.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच आणि अमिताभ यांच्यात फार घनिष्ठ संबंध होते. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र असताना दोघांनी एकमेकांबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
बाळासाहेब यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या टिझर लाँचवेळी अमिताभ तिथे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या नात्याविषयी बोलतात अमिताभ यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
बाळासाहेबांनी अमिताभ यांना नेहमी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिल्याचं त्यांनी सांगितल.
त्यावेळी बाळासाहेबांविषयी एक किस्सा सांगत अमिताभ म्हणाले, १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ यांचा अपघात झाला तेव्हा ते सुरुवातीला बंगळुरुत बेशुद्ध अवस्थेत होते. तेथून अमिताभ यांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं. पावसाळा होता आणि मुंबईत तुफान पाऊस सुरु होता.
अमिताभ यांना मुंबई विमानतळावरुन थेट ब्रीच कॅण्डी रुग्णालयात न्यायचं होतं. पण अमिताभ यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हती. पण त्यावेळी शिवसेनेची रुग्णवाहिका अमिताभ यांच्या मदतीला धावून आली.
जर त्या दिवशी, त्या क्षणी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका आली नसती तर कदाचित समस्या गंभीर झाली असती असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं.
अमिताभ यांच्यावर जेव्हा कधी गंभीर आरोप व्हायचे तेव्हा बाळासाहेब ठाकरे फोन करुन हे खरं की खोटं अशी विचारणा करत असत. बऱ्याचवेळा चर्चा करण्यासाठी ते अमिताभ बच्चन यांना बोलावत असत
एकदा अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबावर एक गंभीर आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी अमिताभ यांना फक्त बोलवलं नाही तर बाजुला बसवून या विषयी संपूर्ण माहिती घेतली होती आणि त्यात किती सत्यता आहे असा प्रश्न विचारला होता.
दरम्यान, त्यावेळी अमिताभ यांनी हे खोटं असल्याचं सांगितलं. त्यावर, बाळासाहेबांनी पुन्हा एकदा खरं आहे का विचारलं आणि न घाबरण्याचा सल्ला दिला.
“बाहेर वादळ सुरु आहे, तू आत्ताच घरी थांब…हे वादळ लगेच संपेल तेव्हा तू बाहेर निघ आणि जेव्हा तू निघशील तेव्हा मी सोबत असेन,” अशा शब्दांत बाळासाहेबांनी अमिताभ बच्चन यांना धीर दिला होता.
अमिताभ यांना इतका पाठिंबा त्यावेळी इतर कोणीच दिला नव्हता. यामुळेच अमिताभ यांच्या मनात नेहमीच बाळासाहेबांबद्दल आदर राहिला आहे.
पुढे एक किस्सा सांगत अमिताभ यांनी त्यांच्या मनात बाळासाहेबांना वडिलांचा दर्जा दिल्याचा खुलासा केला.
अमिताभ यांचं लग्न झाल्यानंतर बाळासाहेबांनी जया बच्चन यांची भेट करुन देण्यासाठी त्या दोघांना घरी बोलावलं होतं.
अमिताभ जया बच्चन यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले असता मीनाताई ठाकरे यांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं होतं.
अमिताभ बच्चन म्हणाले, मीनाताईंनी अगदी आपल्या सुनेप्रमाणे जया यांचं स्वागत केलं. तेव्हा त्याच क्षणी मी बाळासाहेबांना माझ्या मनात वडिलांचा दर्जा दिला. आपले नेहमी कौटुंबिक संबंध राहतील हे तेव्हा मी ठरवलं.
बाळासाहेब जेव्हा आजारी होते तेव्हा अमिताभ त्यांना भेटले होते.
बाळासाहेबांना अशा अवस्थेत पाहणं अमिताभ बच्चन यांना फार अवघड होतं. अमिताभ यांना बाळासाहेबांच्या खोलीत एक गोष्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
बाळासाहेबांच्या खोलीत भिंतीवर त्यांचा फोटो होता. अमिताभ यांनी असा कधी विचारच केला नव्हता. आपला फोटो पाहून अमिताभ बच्चन भावूक झाले होते. तो क्षण कधीही विसरणार नसल्याचं अमिताभ सांगतात
दरम्यान, अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ चे सुत्रसंचालन करत आहेत. अमिताभ यांनी नुकतच ‘गुड बाय’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यासोबतच ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत