क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान यावेळी कोर्टाने आर्यन खानला जामीन नाकारताना काही महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले. जाणून घेऊयात कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर नेमके कोणते निष्कर्ष नोंदवले
आर्यन हा नियमितपणे अमलीपदार्थाबाबतच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता आणि त्याचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता असं कोर्टाने म्हटलं.
न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, असं कोर्टाने यावेळी सांगितलं.
“आरोपी क्रमांक १ (आर्यन खान) आणि २ (अरबाज मर्चंट) खूप काळापासून मित्र आहेत. त्यांनी अनेकदा एकत्र प्रवास केला असून क्रूझवरही त्यांना एकत्रित पकडण्यात आलं. शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये ड्रग्ज होते आणि आर्यन खानला याची कल्पना होती असं दिसत असल्याचं कोर्टाने यावेळी म्हटलं.
केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सादर केलेल्या पुराव्यांतून आर्यनसह या प्रकरणी अटक करण्यात आलेले सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यानुसार कटात सहभाग असल्याचे कलम त्यांना लागू होते असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्ज पुरवठादार आणि तस्करांशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच आरोपींनी हा गुन्हा केलेला नाही असे या टप्प्यावर मानणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.
व्हॉट्सअप चॅटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा उल्लेख असून आर्यन खान याचा व्यवहार करणाऱ्यांच्या संपर्कात होता असं प्रथमदर्शनी दिसत आहे.
एनसीबीने आरोपी क्रमांक १ आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा भाग असणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात असून त्याप्रकरणी तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. एनसीबी त्यांचा शोध घेत असल्याचं कोर्टाने यावेळी नमूद केलं.
सर्व आरोपी प्रभावशाली असून त्यांच्यापैकी कोणालाही जामीन मिळावा तर पुराव्यासोबत छेडछाड होऊ शकतात असंही कोर्टाने सांगितलं.
कोर्टाने यावेळी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीवर करण्यात आलेल्या कारवाईचा संदर्भ दिला. त्याच्या व्हॉट्सअप चॅटमधूनही त्याचे ड्रग्ज तस्करांशी थेट संबध असल्याचं उघड झालं होतं असं कोर्टाने यावेळी नमूद केलं.
दरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.
करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला.
यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं.
२ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.
शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. मात्र अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला.
शाहरुख खान नेहमीप्रमाणे आलिशान कारमध्ये न येता साध्या कारने पोहोचला होता. तसंच यावेळी त्याच्यासोबत फक्त सुरक्षारक्षक होती. पत्नी गौरी किंवा मुलगी सोबत नव्हती.
यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला.
शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.