दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या काळात घरासमोर असणारा आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घराची शोभा वाढवतात.
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीच्या सणाचे अवघ्या काही दिवसांनी आगमन होणार आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
प्लास्टिकबंदी तसेच चिनी साहित्यावर बहिष्कार टाकल्याने बाजारात भारतीय बनावटीच्या साहित्याला मोठी मागणी सुरू झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका आकाश कंदिलाची चर्चा रंगली आहे.
साधारणपणे खणापासून तयार केलेले ड्रेस, ब्लाऊज, पर्स हे आपण ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण कधी खणापासून तयार केलेला आकाश कंदील पाहिला आहे का?
‘आश्वी डिझाइन्स’ या ब्रॅण्डने दिवाळीसाठी खणाचे आकाशकंदील डिझाइन केले आहेत.
महाराष्ट्राच्या संस्कृतीत खणाच्या कापडाचं एक वेगळंच महत्त्व आहे.
काळाचौकीमध्ये राहणारी निकिता लाड हिच्या कल्पनेतून ‘आश्वी डिझाइन्स’ हा ब्रॅण्ड साकारला गेला आहे.
पर्यावरणपूरक दिवाळीची कास धरत लाकडाला खण कापडाची जोड देत हे आकाशकंदील तिने तयार केले आहेत
सण-उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजीही घ्यायला हवी. त्यामुळे पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यावर भर देत असल्याचे निकिताने सांगितले.
अत्यंत आकर्षक आणि देखण्या दिसणाऱ्या या कंदिलांना सध्या खरेदीदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत.
‘आश्वी डिझाइन्स’ या इन्स्टाग्राम पेजवरून हे आकाशकंदील तुम्हाला ऑनलाइनसुद्धा ऑर्डर करता येतील.
(सर्व फोटो सौजन्य : आश्वी डिझाइन्स / इन्स्टाग्राम)