महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून निधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘ लीडर्स’चा दर्जा मिळाला आहे. तसेच नवोपक्रमासाठी लागणारा बीज निधी (सीड फंड) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवोपक्रम संस्थेकडून विद्यापीठे, नवउद्यमी केंद्रे, कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाते. या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत नवउद्यमी केंद्रांचे ‘बिगीनर्स’, ‘एमर्जिंग’ आणि ‘ लीडर्स’ या तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. त्यात विद्यापीठाच्या कामगिरीनुसार लीडर्सचा दर्जा देण्यात आला.
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, पुणे आणि जवळपासच्या नवउद्यमींसह विभाग कार्यरत आहे. विभागातर्फे अनेक नवोपक्रम केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी विद्यापीठ संलग्न आहे. विभागातील नवउद्यमींना बाह्य स्रोतांकडून निधीही मिळाला आहे. विद्यापठाला मिळालेला लीडर्स दर्जा तळागाळातील नवकल्पनांना मार्गदर्शन करून पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
इनोफेस्ट २०२१ मधील विद्यार्थ्यांना नवउद्यमी प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मार्गदर्शन मिळण्यासाठी ७ मे ते १७ जून या कालावधीत मेंटॉरशिप प्रोग्राम होत आहे. त्यात ६० कं पन्यांनी सहभाग घेतला असल्याचेही डॉ. पालकर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने योग्य नियोजन करत नवउद्यमींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भविष्यात नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या दिशेने प्रगती होईल. महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून दर्जा मिळणे ही एक छोटी पायरी आहे. पुढील काळात या क्षेत्रात आणखी मोठे काम करण्याचा मानस आहे. – डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ