रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे काम गतीने
पुणे : नव्याने लिहिण्यात आलेले नाटक, संगीत नाटक, एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांच्या संहितांच्या परीक्षणाचे काम रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून पूर्णत्वाकडे गेले आहे. गेल्या वर्षभरात मंडळाला प्राप्त झालेल्या सुमारे ७०० ते ८०० नाट्यसंहितांच्या परीक्षणाचे काम पूर्ण होऊन लेखकांना प्रयोग सादरीकरणासाठीचे प्रमाणपत्रही पाठविण्यात आले आहे.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मंडळाच्या पुनर्रचनेनंतर कार्यकारिणीतील सर्व सदस्यांसह मंडळाचे काम गतीने सुरू आहे.
गोडबोले म्हणाले, नवीन नाटक आणि एकांकिका यांच्या संहितांच्या परीक्षणाचे काम टाळेबंदीतही जोमाने सुरू आहे. गेल्या दीड वर्षांत मंडळाकडे आलेल्या अनेक संहितांच्या परीक्षणाचे काम मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांकडून सुरू आहे. जवळपास आठशे संहितांचे परीक्षण सुरू असून, त्यातील बहुतांश संहितांच्या लेखकांना प्रमाणपत्रही पाठविण्यात आले आहेत. यामध्ये एकांकिकांच्या संहितांची संख्या अधिक आहे. या संहितांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी आढळलेल्या नाहीत. तर, अभिव्यक्तीमध्ये वेगवेगळे विषय हाताळण्यात आले आहेत. कोणत्याही नाटक किंवा एकांकिकेचा प्रयोग थांबू नये म्हणून संहितांचे लवकरात लवकर परीक्षण करून त्याचे प्रमाणपत्र देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
प्राप्त झालेल्या संहिता
२०१८ – १८४३
२०१९ – २०१६
२०२० – ४७४
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील सदस्य संहिता वाचल्यानंतर १० ते १५ दिवसांमध्ये त्या संहितेबद्दलचा अभिप्राय पाठवतात. त्यानंतर लेखकांना प्रमाणपत्र देण्यात येते. करोनाच्या काळात सदस्यांना घरी संहिता पाठविण्यात आल्या असून, त्यांचे परीक्षणाचे काम सुरू आहे. जिल्हाबंदीमुळे गेल्या १५ दिवसांपासून प्रमाणपत्रांच्या वितरणामध्ये काही अडचणी आहेत. परंतु, गेल्या महिन्यात परीक्षण झालेल्या संहितांच्या लेखकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मंडळाकडून चित्रपट आणि दूरचित्रवाणी वगळता व्यावसायिक नाटक, प्रायोगिक नाटक, एकांकिका, संगीत बारी अशा सर्व प्रकारच्या संहितांचे परीक्षण केले जाते. हिंदी, इंग्रजी, तामिळ, गुजराती कुठल्याही भाषेतील नाटकाचा महाराष्ट्रात प्रयोग करायचा असेल तर मंडळाचे प्रमाणपत्र गरजेचे असते. – श्रीरंग गोडबोले, अध्यक्ष, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ