पुणे : करोनाविषयक औषधे आणि साधनांवरील कर कमी करावेत आणि राज्याचे वस्तू व सेवा करापोटीचे २२ हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशा आग्रही मागण्या केंद्राकडे के ल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले.
वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४३ वी परिषद शुक्रवारी पार पडली. या परिषदेला दूरदृश्यप्रणालीद्वारे पुण्यातून राज्याचे अर्थमंत्री पवार उपस्थित होते.
याबाबत पवार म्हणाले, ‘करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये वैयक्तिक सुरक्षा कवच (पीपीई किट), प्राणवायू, इंजेक्शन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या वस्तूंवर १२ ते २८ टक्क्यांपर्यंत कर आहे.
जीएसटीच्या राज्याच्या वाटय़ाच्या ४६ हजार कोटींपैकी २४ हजार कोटी रुपये मिळाले असून उर्वरित २२ हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.