पुणे : नवसंकल्पना आणि उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांना शाळास्तरापासूनच मार्गदर्शन मिळण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि नवसंकल्पना कक्ष (इनोव्हेशन सेल) यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) साहाय्याने इनोव्हेशन अॅम्बेसिडर हा नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत सीबीएसईशी संलग्न शाळांतील ५० हजार शिक्षकांना नवसंकल्पनांचे धडे देण्यात येणार असून, या शिक्षकांच्या माध्यमातून शाळास्तरावर नवसंकल्पना, उद्योजकता पूरक वातावरण निर्मिती करण्यावर भर आहे.
विद्यार्थ्यांना चौकटीबाहेरचा विचार करू देण्याबाबत नव्या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा विचार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी मार्गदर्शक होऊन विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन अॅम्बेसिडर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी एआयसीटीई, नवसंकल्पना कक्ष आणि सीबीएसई एकत्र आले आहेत. या अंतर्गत ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये अभिकल्प विचार (डिझाइन थिंकिं ग) आणि नवसंकल्पना, नवसंकल्पना आणि सहकार्य, बौद्धिक संपदा अधिकार, उत्पादन आणि प्रारूप निर्मिती या विषयांचा समावेश आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना शाळेमध्ये नवसंकल्पना, उद्योजकता पूरक वातावरण निर्मिती, सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जवळच्या शाळांनाही सहकार्य आणि मार्गदर्शन, राष्ट्रीय पातळीवरील नवसंकल्पना स्पर्धेत परीक्षक, नवसंकल्पना आणि संबंधित उपक्रमांसाठी मार्गदर्शक अशा जबाबदाऱ्या निभावाव्या लागतील.
शाळास्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पना रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांमधून नवसंकल्पनाचा शोध घेता आला पाहिजे, विद्यार्थ्यांना नवसंकल्पनांसाठी प्रोत्साहित करता यायला हवे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. इनोव्हेशन अॅम्बेसिडर प्रकल्पासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षक त्यांच्या शाळास्तरावर नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करतील. आतापर्यंत शाळांमध्ये के वळ निकालाची स्पर्धा होती. पण आता शाळांनी किती बौद्धिक संपदा हक्क मिळवले, किती नवसंकल्पना-नवउद्यमी निर्माण झाल्या, किती उत्पादने विकसित केली यासाठी स्पर्धा करायला हवी.
– डॉ. अभय जेरे, मुख्य नवसंकल्पना अधिकारी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय
आपल्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी यातच अडकून पडली आहे. नवीन काही सुचणे, नवीन काही करणे ही परीक्षेपलीकडील बुद्धिमत्ता आहे. सध्या शालेय शिक्षणात-अभ्यासक्रमात अशा प्रयोगांना स्थान नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि सर्जनशीलतेतून नावीन्यपूर्ण उत्पादने, उद्योजकता विकसित करणे शक्य आहे. अटल टिंकरिंग लॅब शाळांमध्ये निर्माण झाल्या असल्या, तरी त्यासाठी मार्गदर्शन करणारे सक्षम शिक्षक असायला हवेत. ती गरज पूर्ण करण्यासाठी इनोव्हेशन अॅम्बेसिडर हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पाद्वारे नवसंकल्पना पूरक वातावरण निर्मिती शाळांमध्ये होऊ शकेल. शिक्षकांसह विविध क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरेल. – मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञान प्रबोधिनी