पुण्यातील पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी लागलेल्या या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांमध्ये १५ महिला कामगारांचा समावेश होता. आग इतकी भीषण होती की, मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. नातेवाईकांची डीएनए तपासणी करुन मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान ससून रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी झाली असून मृत्यु झालेल्यांमध्ये संभाजी गावडे यांच्या भावाची सून मंगल आणि पुतणी सुमन यांचाही समावेश आहे. मंगल यांचा कामाचा पहिलाच दिवस होता. दुर्दैवाने तो त्यांचा अखेरचा दिवसही ठरला.
पिरंगुटमध्ये अग्नितांडव : १८ कामगारांचा मृत्यू
“माझा पुतण्या बबन आणि सून मंगल हे काल कंपनीत कामावर गेले होते. तसेच त्यांच्या सोबत सुमन देखील गेली होती. दुपारी जेवण केल्यावर अडीचच्या सुमारास सर्व जण काम करत होते, तेव्हा अचानक स्फोट झाला आणि आग लागली,” असं संभाजी गावडे यांनी सांगितलं आहे.
Pune MIDC Fire : आगीचं क्रौर्य! ‘त्या ’ १८ जणांची ओळखही पटेना
“माझा पुतण्या बाहेरच्या बाजूला काम करत होता, तर सून आतील बाजूला काम करत होती. बबन उडी मारून बाहेर पडला. पण सून चारही बाजूने आगीत अडकून पडली. तिला वाचवण्यासाठी पुतण्या बबनने खूप प्रयत्न केले. मात्र काही होऊ शकले नाही. तर पुतणी सुमन संजय ढेबे हीदेखील तिथेच चार पाच महिन्यापासून कामाला होती. तिचा देखील होरपळून मृत्यू झाला,” सांगताना संभाजी गावडे यांना अश्रू अनावर होत होते.