पुणे : पुणे महापालिके कडून दांडेकर पूल परिसरातून वाहणारा आंबिल ओढा सरळ करण्यात येणार आहे. मात्र, नैसर्गिक ओढय़ाचा प्रवाह अशाप्रकारे बदलता येतो किं वा कसे?, याबाबतची तपासणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. मुंबई महापालिका आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून यासंबंधीची माहिती घेण्यात येणार आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेतील बाधित आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘गेल्या आठवडय़ात महापालिके ने के लेल्या कारवाईची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दांडेकर पूल परिसरातून वाहणारा आंबिल ओढा सरळ करण्यात येणार आहे. मुळात अशाप्रकारे नैसर्गिक ओढय़ाचा प्रवाह बदलता येतो किं वा कसे?, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे स्वत: माहिती घेणार आहेत. पुनर्वसन होईपर्यंत दिलेली पर्यायी जागा चांगली नसल्याचे बाधितांचे म्हणणे असल्याने महापालिके च्या घरांमध्ये संबंधितांना स्थलांतरित करण्याबाबत बैठक घेणार आहे. आंबिल ओढय़ाच्या उगमापासून हा ओढा मुठा नदीला मिळतो, तिथपर्यंत मी स्वत: बुधवारी पाहणी करणार आहे.’ झोपुप्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ‘या ठिकाणची १३४ कुटुंब बाधित होत असून त्यापैकी ९२ कुटुंबांनी स्थलांतर के ले आहे. तसेच ३८ कुटुंब जागेवरच राहत आहेत. या परिसरातील ६०० कुटुंबांसाठी झोपुप्रा पुनर्वसन प्रकल्प राबवत असून त्यामध्ये गेल्या आठवडय़ातील पात्र बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत.’ शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक बाळा ओसवाल, माजी गटनेते अशोक हरणावळ या वेळी उपस्थित होते.
आयुक्तांना उत्तर द्यावेच लागेल
गेल्या आठवडय़ातील कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, कारवाईच्या आदल्या दिवशी प्रशासनाऐवजी विकासकाच्या नोटिस बाधितांना कशा बजावण्यात आल्या?, याबाबत महापालिका आयुक्तांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायालयात उत्तर द्यावेच लागेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.