पुणे : फुकट बिर्याणीची मागणी करण्याचा आरोप असलेल्या पुण्यातील पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी आता त्यांची बाजू एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. बिर्याणीबद्दल व्हायरल झालेली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेली ती ऑडिओ क्लिप मॉर्फ्ड अर्थात बनावट असल्याचा दावा आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियांका नारनवरे यांनी केलाय.
त्याचबरोबर त्या ज्या झोनच्या पोलीस उपायुक्त आहेत तिथे मागील बारा वर्षांपासून सुरु असलेले वसुलीचे रॅकेट आपण उद्धस्त केल्यामुळेच आपल्याविरुद्ध बनावट क्लिपच्या सहाय्याने कट रचण्यात आल्याचा आणि त्याला पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. आपली बदली व्हावी यासाठी हे कारस्थान रचलं गेल्याच प्रियांका नारनवरे यांनी म्हटलय.
काय म्हटलंय पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी? प्रियांका नारनवरे यांनी यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं, "माझ्याबद्दलची क्लिपिंग जी व्हायरल केली जात आहे ती मॉर्फ्ड क्लिप आहे, माझ्याविरोधातील षडयंत्राचा भाग आहे. जवळपास 12 वर्षांपासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या हप्तेखोरीची आणि अवैध धंद्यांशी संबंध असणारी जी साखळी होती ती साखळी तोडण्याचा मी प्रयत्न केला. इतरही अपप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले. म्हणून त्यांनी माझ्याविरोधात हे षडयंत्र रचलं आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, "या मॉर्फ्ड क्लिपमधून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, माझं नुकसान आणि बदली करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले आहेत. अवैध प्रकाराशी संबंध असलेले आपल्या खात्यातील काही लोक दुखावले गेल्याने त्यांनी माझी बदनामी सुरु केलीय. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने हे माझ्या विरोधातील कटकारस्थान आहे."