पुणे : करोना संसर्ग झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार, बाह्यरुग्ण तपासणी, उपचारांसमवेत आहार-व्यायाम यांसह मानसिक आधारासाठी समुपदेशन, गरजू कुटुंबांना शिधावाटप, आयुर्वेदिक काढा आणि मुखपट्टीचे वितरण, करोनामुळे अलगीकरणात असलेल्या कुटुंबांना जेवणाचा डबा, लसीकरण मोहीम आणि लस घेण्यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन अशा विविध माध्यमांतून ‘स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती’ने वंचित घटकातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे ‘सुराज्य’ स्थापित केले. गेल्या दीड वर्षांपासून हा सेवाकार्याचा सेतू अविरतपणे सुरू आहे.
स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती या स्वयंसेवी संस्थेतर्फे वंचित घटकाच्या हितासाठी गेल्या दोन दशकांपासून सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प कार्यरत आहेत. येरवडा, वडगावशेरी परिसरातील भागात ५४ वस्त्यांमध्ये मुला-मुलींसाठी मोफत अभ्यासिका वर्ग, महिला बचत गट, किशोरी व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्प, महिला प्रशिक्षण केंद्र असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती संस्थेचे प्रकल्प प्रमुख विजय शिवले यांनी दिली.
करोनाचा प्रादुर्भाव वस्त्यांमध्ये वाढत असताना येरवडा, वडगावशेरी परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हत्या. ही बाब ध्यानात घेऊन नाना पालकर स्मृती समितीने आरोग्य भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीनगर येथील स्वातंत्र्यसेनानी गंगाराम कर्णे हॉस्पिटल येथे ५ जुलै २०२० रोजी आरोग्य केंद्र सुरू केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने चालविण्यात येणाऱ्या बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरातील नागरिक या रुग्णसेवेचा लाभ घेत आहेत. या केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये औषधोपचारांबरोबरच आयुर्वेदिक काढे, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. महिलांच्या प्रकृतीच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. बाह्यरुग्ण विभागात उपचारांसोबतच रुग्णांना आहार, व्यायाम याचे मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले. हा विभाग रविवारीही कार्यरत असतो. संस्थेचे शंभराहून अधिक कार्यकर्ते सेवाकार्यांमध्ये काम करत आहेत, असे शिवले यांनी सांगितले.
मदत… विधवा, निराधार, अपंग, रोजगाराची कमतरता असलेल्या कुटुंबांना घरोघरी शिधावाटप करण्यात आले. संस्थेने स्वयंपाकाची सुविधा नसलेल्या घरांमध्ये तयार खिचडीवाटप केले. महिला बचत गटांकडून १५ हजारांहून अधिक मुखपट्ट्यांची निर्मिती करून त्यांचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थिनींना घरोघरी सॅनिटरी नॅपकिनचे वितरण केले गेले.