पुणे : चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी खेटे मारणाऱ्या सुरेश पिंगळे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर पेटवून घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे सापडली होती. गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक समस्यांमुळे पिंगळे तणावाखाली असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त सागर पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
पिंगळे यांनी चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. पडताळणीत पिंगळे नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात कोथरूड, समर्थ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले होते. नामसाधम्र्यामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. दोन पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अहवालातून सुरेश पिंगळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. उर्वरित एका पोलीस ठाण्याकडून पडताळणी अहवाल मिळणे अपेक्षित होते.
सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्याच एका व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्राथमिक चौकशीत पिंगळे यांना दाखला मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
– दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री