पुणे : मराठी प्रांगणात गंभीर आणि अतिसाहित्यिक वळणाच्या नियतकालिकांचा दबदबा असताना गूढ-विज्ञान-संदेह-रहस्य अशा उपेक्षित साहित्याला प्राधान्य देत लेखकांची एक पिढी घडविणाऱ्या ‘हंस’, ‘नवल’ आणि ‘मोहिनी’ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि प्रसिद्ध लेखक आनंद अंतरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ज्येष्ठ संपादक दिवंगत अनंत अंतरकर यांचे आनंद हे पुत्र होत.
त्यांच्यामागे पत्नी प्रियदर्शिनी, पुत्र अभिराम, कन्या मानसी, प्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू हे जावई असा परिवार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर या त्यांच्या भगिनी होत.
दोन महिन्यांपूर्वी अंतरकर यांच्या पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. आजारी असतानाही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी आनंद अंतरकर यांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बहुतांश पूर्ण केले होते. ७५ वर्षांच्या परंपरेनुसार तिन्ही नियतकालिकांचे दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत, असे अभिराम अंतरकर यांनी सांगितले.
योगदान…
अनंत अंतरकर यांच्या निधनानंतर आनंद ‘हंस’, ‘नवल’ आणि ‘मोहिनी’ मासिकाचे संपादक झाले. या तिन्ही अंकांचे रूप पालटून त्यांनी वाचकांना आकर्षित केले. हंसद्वारे जगभरातील उत्तम साहित्याचे अनुवाद विशेषांक तसेच देशी वाणाच्या कथा वाचकांना मिळाल्या, भय-गूढ-विज्ञान विषयांवर नवलमधून चकित करणाऱ्या मुबलक कथा उपलब्ध करून दिल्या. तर मोहिनीद्वारे रसाळ विनोदाचा अव्याहत पुरवठा त्यांनी केला.
लेखकांचा गोतावळा…
हंस,नवल, मोहिनी या अंकांमध्ये साठोत्तरीच्या काळात लिहिणाऱ्या किंवा लेखन सुरू करणाऱ्यांची यादी पाहिली तरी आनंद अंतरकरांच्या संपादन कालातील या नियतकालिकांचे योगदान लक्षात येऊ शकेल. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा, सुबोध जावडेकर यांच्या विज्ञानकथा या अंकांतून येत. श्री.दा.पानवलकर, जी.ए.कुलकर्णी यांच्या कित्येक कथा हंसमध्ये झळकल्या. जी. ए. कुलकर्णी नवलसाठी काही खास भयकथा अनुवाद करून देत. द.चिं. सोमणांपासून नारायण धारपांपर्यंत लेखक या मासिकांनी जोडले. सत्यकथा, मौजेतील लेखकांचा गोतावळा या नियतकालिकांतही दिसे.
ग्रंथसंपदा…
आनंद अंतरकर यांची ‘घूमर’, ‘झुंजुरवेळ’, ‘एक धारवाडी कहाणी’ (अनंत अंतरकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित पुस्तक), ‘रत्नकीळ’ आणि ‘सोपिया’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.