पुणे : शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) आणि शिक्षणशास्त्र पदवीच्या (बी.एड.) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार राज्य परीक्षा परिषदेने १० ऑक्टोबरला होणाऱ्या टीईटीचे अर्ज भरण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली असून, विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटीसाठीच्या अर्जांची प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र डी.एड. आणि बी.एड. झालेल्या उमेदवारांनाच टीईटी परीक्षा देण्याची मुभा परीक्षा परिषदेने दिली होती. त्या विरोधात उमेदवारांनी आवाज उठवल्यानंतर शिक्षण विभागाने डी.एड. आणि बी.एड.च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही टीईटीचे अर्ज भरण्यास परवानगी देण्याचे आदेश परीक्षा परिषदेला दिले. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी टीईटीचा अर्ज भरताना व्यावसायिक अर्हतेची माहिती भरताना त्यांना लागू असलेल्या पदविका, पदवी या संदर्भात मागील परीक्षेची (पदविका प्रथम वर्ष, पदवी तृतीय सत्र इत्यादी) माहिती भरावी.
प्रमाणपत्र क्रमांकाऐवजी संबंधितांनी त्यांच्या परीक्षेचा बैठक क्रमांक नोंद करावा. प्रवेश अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट के ले आहे.