पुणे : पुणे (Pune) शहरात मागच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patients) चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाची दैनंदिन संख्या ही 97 पर्यंत खाली आलेली असताना दोनच दिवसांत एका दिवसांत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 399 वर गेली होती. त्यात पुढचे काही दिवस हे सणासुदीचे असल्यानं बाजारपेठांमध्ये गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या कारणाने, प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात पुढच्या काही दिवसांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच तयारीला वेग घेतला आहे. (Out of the corona patients in the state, 26% corona patients are in Pune alone)
निर्बंध शिथील झाल्याचा परिणाम रुग्णसंख्येवर
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे पुण्यात निर्बंध शिथील झाल्याचा परिणाम सक्रिय रुग्णसंख्येवर दिसून येत आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुण्यात आहेत. त्यांची टक्केवारी ही 26 टक्के आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 51 हजार 238 सक्रिय कोरोना रुग्ण होते. त्यापैकी सुमारे 26 टक्के म्हणजे 13 हजार 515 सक्रिय रुग्ण हे एकट्या पुण्यात आहेत.
विविध उपाययोजना सुरू
पुढच्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्णाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेची सर्व रुग्णालये, अद्ययावत करणे, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करणे, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याठिकाणी चाचण्यांचं प्रमाण वाढवणं अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
सरासरी रुग्णांची संख्या ही 250
शहरात गेल्या दोन आठवड्यांमध्ये फक्त चार दिवस 200 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या आढळून आली होती. 25 ऑगस्टला तर एका दिवसात 399 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या कालावधीत सरासरी रुग्णांची संख्या ही 250 आहे. काही दिवस रुग्णांची कमी-जास्त होत आहे. मात्र, आधीप्रमाणे ती 200 च्या खाली जात नसल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
‘कधीही बेड्स ताब्यात घेतले जाऊ शकतात, तयारीत रहा’
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी पुढच्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे शहरात आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात असताना आता महापालिकेने शहरातल्या सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीही रुग्णालयातले बेड्स ताब्यात घेतले जाऊ शकतात, त्यामुळे तयारीत रहा, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.