पुणे - 'आली आली गौराई, सोनरुप्याच्या पावली'. गणपतीचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात,
दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत, असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतीक आहे, असे मानले जाते.
या दिवशी सर्व माहेरवाशिण एकत्र येऊन गौरीची पूजाअर्चा करतात. महिलांसाठी हे तीन दिवस आनंदाचे उत्साहाचे असतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. फार पूर्वी दानवांचे राज्य होते. दानव हे देवदेवतांना खूपच त्रास द्यायचे. सर्व देवांच्या स्त्रियांना यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली.
म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजाअर्चा केली. प्रार्थना केली. त्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न झाली. त्यांच्यावर आलेले संकट महालक्ष्मीच्या कृपेने टाळले.
या घटनेची आठवण म्हणून गौरी हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड राहावे हा त्यामागचा हेतू आहे. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात.
राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारांमध्ये गौरी बसवल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.
प्रामुख्याने अनेकांकडे पारंपरिक पद्धतीनुसार शाडू माती, पितळ्याचे मुखवटे असणाऱ्या उभ्या गौरी, खड्यांच्या गौरी, तेरड्याच्या गौरी असतात. तर काही ठिकाणी तांब्यांवर गौरी बसविण्याची प्रथा आहे.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा