‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या नावावर भारतातील नागरिकांची पाकिस्तानमधील काही हॅकर फसवणूक करत असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे. पाकिस्तानी व्हॉटसऍप नंबरवरून एका तरुणीला व्हिडिओ आला, त्यात तुम्ही २५ लाख जिंकले असून त्या व्हिडिओमध्ये दिलेला नंबर तुम्ही व्हाट्सऍप ग्रुप ला ऍड करा असं म्हटलं आहे.
यावर सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांनी म्हटलं आहे की, हा हॅकिंगचा प्रकार असून अशा प्रलोभनाला बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष करावं. तो नंबर ग्रुपमध्ये ऍड केल्यास तुमच्या आणि इतरांच्या मोबाईलचा डेटा हॅकर पाहू शकतो. यातून तुमची मोठी आर्थिक फसवून होऊन खासगी गोष्टी पाहू शकतो, असं लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील २४ वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. नंबरही अनोळखी होता. ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून तुम्ही २५ लाख जिंकले असून दिलेला नंबर तुम्ही व्हाट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करा, तसेच फोन करून तुम्ही अधिक माहिती घ्या असं त्यात म्हटलं आहे. तरुणी शिक्षित असल्याने कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतला, तेव्हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं आहे. मात्र, ज्या नंबरवरून व्हिडिओ आला, तो पाकिस्तानमधील असल्याचं निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नका. हा एक हॅकिंगचा प्रकार असून अनोळखी नंबर ग्रुपमध्ये ऍड केल्यास हॅकर लिंक शेअर करून, ती इतर व्यक्तींनी नकळत क्लिक केल्यास त्याचा मोबाईल हॅक होऊ शकतो. तसेच, मोबाईलमध्ये सेव्ह असलेले बँक डिटेल्स, खासगी फोटो याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. तसेच, त्या नंबरवर फोन करणे अधिक धोकादायक आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
+923234548540 (पाकिस्तान) 8874104431 (हा नंबर ग्रुपमध्ये ऍड करू नये)