शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवादावर भर देण्याची कृती गटाची सूचना
पुणे : गेले दीड वर्ष शाळा सुरू नसल्याने, वेगवेगळ्या परिस्थितीतून गेल्याने मुलांना भावनिक आधाराची गरज आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्यावर लगेच अभ्यास, परीक्षा, अभ्यासक्रमाची पूर्तता याकडे न वळता किमान एक दोन आठवडे मुलांशी मुक्त संवाद साधावा. मुलांना मन मोकळे करू द्यावे, मित्रांशी संवाद साधू द्यावा. त्यासाठी शिक्षकांना मुलांचे समुपदेशक, हितचिंतक, मित्र व्हावे लागेल, असे मार्गदर्शन राज्य शासनाच्या वैद्यकीय कृती गटाचे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी शुक्रवारी केले.
राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) झालेल्या शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शन सत्रात डॉ. दलवाई बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. दलवाई म्हणाले, की करोना काळात मुलांमध्ये बदल झाला आहे. प्रत्येक मूल वेगळ्या परिस्थितीतून आलेले असल्याने शिक्षकांनी पुढील काही महिने प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष द्यायला हवे. मुलांना भावनिक आधाराची गरज आहे. मुलांना खरोखरच आनंद वाटेल असे वातावरण शाळेत असायला हवे.
करोना काळ शिक्षणासाठी आमूलाग्र बदलाचा ठरला. आता शाळा सुरू करण्याबाबत घ्यायच्या काळजीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
पहिली ते चौथीचे वर्गही सुरू व्हावे..
शिक्षकांनी पालकांमधील भीती कमी करण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. प्रतिबंधात्मक उपायांची अंमबजावणी करून मुलांना शाळेत पाठवणे शक्य आहे. शहरी भागातील मुलांना मोबाइल स्क्रीनची सवय झालेली असल्याने शिक्षकांनी मुलांशी संयमाने वागून मुलांशी संवादाचे वेगवेगळे मार्ग शोधावे. पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्याची गरज आहे, असे हेमांगी जोशी यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर अप्रिय प्रसंग घडू शकण्याची जाणीव ठेवूनच शाळा सुरू कराव्या लागतील. करोना काळात शिक्षकांनी नेटाने अध्यापनाचे अनेक प्रयोग केले असले, तरी प्रत्यक्ष शाळांना पर्याय नसल्याचेअधोरेिखत झाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेची सर्वाधिक गरज असल्याने किमान दिवाळीनंतर तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यायलाच हवा, असे डॉ. वसंत काळपांडे यांनी नमूद के ले.
शाळांच्या वास्तूरचनेमध्ये बदलांची गरज
हिवरे बाजारची शाळा सुरू करून शंभर दिवस झाले. त्याविषयी पोपटराव पवार म्हणाले, की आता जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार असल्याने शासन, ग्रामपंचायत आणि सर्व प्रशासनाची परीक्षा आहे. १५ जूनला शाळा सुरू करून पहिली ते दहावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने चालवले. शाळा सुरू झाल्यानंतरच्या शंभर दिवसांत काही विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली. मात्र शिक्षक, पालकांच्या माध्यमातून संपूर्ण काळजी घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पालक-विद्यार्थ्यांमधील भीती जाऊन विश्वास निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे कोंबडय़ांची खुराडी झाली आहेत. त्यामुळे शाळांची वास्तूरचना बदलून वर्गखोल्या मोठय़ा करण्याची गरज आहे. आमच्या शाळेचे वर्ग मोठे असल्याने वर्गात गर्दी झाली नाही. हिवरे बाजारच्या आजूबाजूच्या चार-पाच गावांतील मुले हिवरे बाजारमध्ये शिक्षणासाठी येतात. आता आजूबाजूच्या दहा गावातील शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
सल्ला काय?
शाळा सुरू होत असताना पालक, शिक्षकांनी पूर्वतयारी करायला हवी. शाळा नसल्याने मुलांचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. तर शिक्षकांनी लगेच अभ्यास, परीक्षेची घाई न करता मुलांना शाळेत रमण्यास वेळ द्यावा. मुलांना लगेचच ज्ञान देण्याची गरज नाही. मुले शाळेत येऊन रमली, की अभ्यासाचा विचार करायला हरकत नाही.
शिक्षण, मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही सर्वाचीच जबाबदारी आहे. शिक्षणाचा उत्सव या धर्तीवर ४ ऑक्टोबरपासून शाळा केल्या जाणार आहेत. – वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री.