पुणे : पुढील एक-दोन दिवसांत राज्यात सर्वच भागांत हवामान कोरडे होणार असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या क्षेत्रासह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सध्या दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. बहुतांश भागात संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहात असल्याने किमान तापमानात मात्र सर्वच भागांत वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढला आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील बुलढाणा, वाशिम येथे अनुक्रमे ९० आणि ८० मिमी पाऊस झाला. रविवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोल्यात ४० मिमी पावसाची नोंद झाली.
मराठवाडय़ातील हिंगोलीत ८० मिमी, तर परभणी, नांदेड येथे चोवीस तासांत प्रत्येकी ७० मिमी पाऊस नोंदविला गेला. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली.
नाशिक येथेही रविवारी पाऊस झाला. एक-दोन दिवसांत महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात हवामान कोरडे होणार आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत गेल्या चोवीस तासांत विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली होती. आणखी एक दिवस मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.