पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत व्यक्ती जखमी झाली असून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. संभाजी बबन आटोळे असं जखमी व्यक्तिचं नाव आहे.
प्रत्यक्षदर्शी गणेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी आटोळे मॉर्निग वॉकला आले होते. मी माझ्या घराच्या गच्चीवर असताना अचानक त्यांच्या अंगावर एका प्राण्याने झडप घातली आणि त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी आवाज दिला. मी पाहिले असता साधारणपणे दीड फूट उंचीचा बिबटया दिसून आला. त्यावर मीदेखील वस्तीवरील लोकांना आवाज देऊन गोळा केले. मात्र तोवर बिबटय़ा पळून गेला.
या घटनेमध्ये संभाजी यांच्या पाठीला मोठी जखम झाली आहे. उपचारासाठी सुरुवातीला त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पुढे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“आमच्या विभागाला सात वाजण्याच्या सुमारास फोन आला की, हडपसर येथील गोसावी वस्ती येथे बिबट्याने व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्यानंतर काही मिनिटांमध्ये आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने पायाचे ठसे आढळून आलेले नाहीत. तसंच प्रत्यक्षदर्शी ज्या प्राण्याचे वर्णन सांगत आहेत त्यावरून नेमक्या कोणत्या प्राण्याने संबधित व्यक्तीवर हल्ला केला हे सांगता येणार नसून शोध सुरू आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गस्त घातली जाईल,” अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एस मुकेश जयसिंग यांनी दिली आहे.