पुणे : शासनाच्या निर्णयानुसार समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये केवळ पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र यंदा विशेष बाब म्हणून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तालयाने शासनाला पाठवला असून, शासनाची मान्यता मिळाल्यास द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहाचा प्रश्न सुटू शकेल.
गेल्या वर्षी समाजकल्याणची वसतिगृहे करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरली जात असल्याने, करोना प्रादुर्भावामुळे महाविद्यालयेही बंद असल्याने समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियाच राबवण्यात आली नाही. मात्र यंदा करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. राज्यात समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ४४१ वसतिगृहांमध्ये मिळून सुमारे ४० हजार जागा उपलब्ध आहेत.