पुणे : शिवसेनेला लक्ष्य करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ‘‘हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा’’, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पुण्यात दिले.
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले. मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले. ज्यांच्याबरोबर दोन पिढ्या वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन शिवसेना बसली, अशा शब्दांत शहा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील बूथ प्रमुखांचा मेळावा आणि बूथसंपर्क अभियान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर सडकून टीका केली.
शहा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदावरून मी वचन मोडले, असा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीवेळी मी राज्यात आलो होतो. त्या वेळी शिवसेनेबरोबर चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे त्या वेळी ठरले होते. मात्र सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली.’’ मी खोटे बोललो होतो, असे काही क्षण गृहीत धरले तर प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येते होते, जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते, हे आठवावे. मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात करण्यात आला, असा आरोपही शहा यांनी केला.
सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे शिवसेनेला वाटत आहे. महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली जात होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. राज्यांनीही दर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. मात्र महाविकास आघाडीने पेट्रोल-डिझेलऐवजी मद्य स्वस्त केले. याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारावा, असे शहा म्हणाले.
राज्याला गतवैभव मिळवून देण्यास महाविकास आघाडी सरकार हतबल आहे. हाच मुद्दा घेऊन कार्यकर्त्यांनी जनतेसमोर जावे आणि आगामी पुणे महापालिका निवडणुकीपासून त्याची सुरुवात करावी, असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीचे रर्णंशगही फुंकले.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा आहे. या रिक्षाची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला आहेत, असे मी सांगितले होते. मात्र त्यात सुधारणा करावी लागेल. केवळ चाके वेगवेगळ्या दिशेला नाहीत तर चाके पंक्चर आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्याला अधोगतीकडे नेत आहे. हे सरकार राज्याला गतवैभव मिळवून देऊ शकत नाही, ही बाब जनतेपुढे आली पाहिजे. त्याची सुरुवात पुणे महापालिका निवडणुकीपासून होणे अपेक्षित आहे.
‘डीबीटी’ सरकार!
गरजूंना थेट मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ (डीबीटी) योजना सुरू केली. या योजनेची व्याख्या महाविकास आघाडीने बदलली. काँग्रेस डीलर, शिवसेना ब्रोकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्रान्सफरमध्ये पैसे घोटाळा असा त्याचा अर्थ केला आहे. त्यामुळे हे ‘डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर बिझनेस’चे सरकार आहे, अशी टीका शहा यांनी केली.
भाजपशी दोन हात करा!
’मुख्यमंत्रीपदासाठी
भाजपचा विश्वासघात, हिंदुत्वालाही सोडचिठ्ठी.
’ फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरले होते, मात्र सत्तेसाठी वचनमोड.
’सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा शिवसेनेचा समज.
’महाराष्ट्र सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा, तिची तिन्ही चाके पंक्चर.
हिंमत असेल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करावेत, असे आव्हान अमित शहा यांनी दिले.