पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणीने शुल्क भरण्यास ३० हजार रुपये नसल्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नम्रता गोकुळ वसईकर असं २४ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. नम्रताचं बिटेक शिक्षण झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती. तिलादेखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल या आशेवर अवघं कुटुंब शहरात स्थायिक झालं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता ही अत्यंत हुशार मुलगी होती. धुळे येथे तिचं बिटेक शिक्षण झालं होतं. नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती. नम्रतालादेखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल या आशेवर सर्व कुटुंब धुळे येथून वाकड येथे स्थायिक झालं होतं. वडील हे वाकड चौकात बूट पॉलिश करण्याचं काम करतात. नम्रताला चांगली नोकरी लागण्यासाठी ऍडव्हान्स कोर्स करायचा होता. त्याचे शुक्ल ३० हजार होते, याबाबत तिने आई वडिलांना माहिती दिली. आई- वडिलांनी नम्रताला काही दिवस थांबण्यास सांगितलं होतं. पैसे आल्यावर हा कोर्स कर असं आई वडिलांनी तिला सांगितलं होत. मात्र, पैसे जमा करून देण्याअगोदरच नम्रताने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
दोन दिवसांपूर्वी तिने घराच्या जवळच असलेल्या माऊली चौकातील इमारतीवर जाऊन चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. उंच ठिकाणाची भीती वाटत असल्याने नम्रताने डोळ्यांवर स्कार्फ बांधला होता अस पोलिसांनी सांगितलं आहे.
हालाखीची परिस्थिती असल्याने अनेकांना शिक्षण घेण्यास अडथळे येतात. मात्र, आत्महत्या करणे हा त्यावरील मार्ग नाही. त्यामुळं तरुण आणि तरुणींनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केलं आहे.