पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री टोळक्याने एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. तरुणाच्या दिशेने गोळीबार (Firing) करत टोळक्याने दहशत निर्माण केली. यावेळी गोळी चुकवून तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे थोडक्यात बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. या प्रकरणी बिबवेवाडी (Bibwewadi) पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार झालेला तरुण अमित कैलास थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपींसोबत झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचा आरोप आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
याबाबत अमित कैलास थोपटे (वय 32 वर्ष, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार सौरभ सरवदे, रुपेश सोनवणे उर्फ डिजे, निलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे आणि इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. तो बिबवेवाडीत राहतो. चार फेब्रुवारी रोजी त्याचा आरोपींसोबत वाद झाला होता.
बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटी समोर तक्रारदार, त्याचा भाऊ आणि इतर मित्र हे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्यावेळी चार फेब्रुवारीला झालेल्या भांडणावरुन आरोपी आणि इतर आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात काठ्या, कोयते होते.
परिसरात येतानाच ते आरडाओरडा करत येत होते. सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. हा सर्व प्रकार पाहून अमित थोपटे, त्याचा भाऊ आणि इतर सर्वजण पळाले. त्यावेळी आरोपीने थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण, थोपटे याने गोळी चुकवल्यामुळे तो जखमी झाला नाही. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर टोळके पसार झाले