रायगड जिल्ह्यासाठी करोनाची दुसरी लाट जास्त व्यापक ठरली आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण तुलनेत कमी आहे ही एक दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ या कालावधीत जिल्ह्यात करोनाची पहिली लाट आली होती. यात ३ लाख ५० हजार २१४ जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. यादरम्यान ६३ हजार ९०२ जणांना करोनाची लागण झाली होती. यातील १ हजार ७१० जणांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू दर २.६७ टक्के इतका होता. पहिल्या लाटेत करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. पण मृत्यूदर जास्त होता.
मार्च २१ पासून जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. यात रुग्णांना करोना लागण होण्याचा वेग खूप जास्त होता. मार्च २१ ते मे २१ अखेर जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार २५३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ६७ हजार ९३२ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील १ हजार ४४४ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेतील मृत्यूदर २.१२ टक्के इवढा होता.
म्हणजेच पहिल्या लाटेच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात दुसरी लाट ही जास्त व्यापक होती. मात्र मृत्यूदर कमी होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ९ सप्टेंबरला सर्वाधिक ९६३ रुग्ण आढळले होते. तर दुसऱ्या लाटेत २१ एप्रिल रोजी सर्वाधिक १ हजार ६५१ रुग्ण आढळले होते. यावरून दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण किता जास्त होते याचा अंदाज येऊ शकतो.
पहिल्या लाटेत पनवेल महानगर पालिका आणि त्यालगतच्या परिसराला करोनाचा सर्वाधिक तडाखा बसला होता. तर दुसऱ्या लाटेत या परीसरातील रुग्णवाढीचे प्रमाण तुलनेत कमी होते. दुसऱ्या लाटेत अलिबाग, पेण, खालापूर, कर्जत, रोहा, माणगाव आणि महाड तालुक्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग तालुक्याला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जास्त फटका बसल्याचे दिसून येत आहे. ज्या विभागात पहिली लाट जास्त तीव्र होती. तिथे दुसऱ्या लाटेचा प्रभाव तुलनेत कमी होता. आता सप्टेंबर २१ च्या आसपास करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या दोन लाटांचा परीणाम आणि प्रादुर्भाव लक्षात घेतला तर दक्षिण रायगडात या तिसऱ्या लाटेचा जास्त फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे आणि लसीकरणाची व्यापकता वाढवणे गरजेचे आहे.
“जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्यासाठी जागा हस्तांतरीत केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. ग्रामिण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सामाजिक संस्थांची यासाठी मदत घेतली जात आहे,” अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.