चिपळूण : चिपळूण येथील वाशिष्ठी नदी मधील गाळ उपसा करण्यासाठी ज्येष्ठ टेअभिनेते नाना पाकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेली नाम फाउंडेशन ही संस्था पुढे आली आहे. यासाठी नामचे संचालक नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर रत्नागिरीत आले होते . जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन त्यांनी सकारात्मक चर्चा केली . यावेळी त्यांच्यासोबत नामचे विश्वस्त सेवानिवृत्त आयएस अधिकारी इंद्रजीत देशमुख, संस्थेचे राज्याचे मुख्य समन्वयक गणेश थोरात, कोकण समन्वयक समीर जानवलकर तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा परिषद रत्नागिरीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे हेही उपस्थित होते . दि. 21 व 22 जुलै रोजी चिपळूण तसेच खेड तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि वाशिष्ठी - जगबुडी नद्याना आलेल्या पुरामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती . त्यामध्ये या दोन्ही तालुक्यांचे अपरिमित नुकसान झाले होते . वाशिष्ठी नदीत जगबुडी नदीचे पाणी येत असल्याने वाशिष्टीच्या पाणीपातळीत अधिक वाढ होते . गेल्या अनेक वर्षापासून या नद्यांमध्ये गाळ काढण्यात आलेला नसल्याने दरवर्षीच या नद्यांना पूर येतो. त्यामुळे या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी भरते. यावर्षीच्या महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पूरग्रस्तांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपाची मदत देण्यात आली होती. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी या नद्यांमधील गाळ काढणे हा गरजेचा उपाय असल्याने कोकणच्या आत्मीयतेपोटी नाम फाउंडेशन पुढे आले आहे . वाशिष्ठी नदीचा गाळ उपसण्यासाठी लागणारी मशिनरी नाम फाउंडेशन कडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार असून गाळ उपशासाठी आवश्यक लोकसहभागासाठी प्रयत्न केला जाणार आहे . जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनीही या प्रस्तावाला होकार देत सकारात्मक चर्चा केली . या बैठकीत नामच्या माध्यमातून साखरपा कोंडगाव येथे झालेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी घेतली. नाम फाउंडेशन मुळे रत्नागिरीतील 08 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 03 अशा एकूण 11 गावांमध्ये जलसमृद्धता आली आहे . अजूनही अनेक गावांमधील कामे पावसाळ्यानंतर होणार आहेत. वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे प्रत्यक्ष काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे . प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वी कामाचे नियोजन जिल्हा प्रशासन व नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आतापासूनच सुरू झाली असल्याची माहिती नामचे संचालक मल्हार पाटेकर यांनी दिली .