कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून काम करताना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या . भास्कर राव शेट्ये यांचे कोकण मराठी साहित्य परिषदेतील त्यांचे मार्गदर्शन हे सर्वांसाठी दिशादर्शक ठरणारे ठरणारे होते . त्यांच्या जाण्याने कोकण मराठी साहित्य परिषदेचे खूप मोठे नुकसान झाल्याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त रमेश कीर यांनी व्यक्त केले. 05 सप्टेंबर रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव आणि माजी न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये यांच्या निधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की भाषा विकास आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केल्यानंतर कोमसापच्या वाटचालीत व संस्था उभारणीत महत्त्वाचे सहकार्य असलेले अरुण नेरुरकर, डॉ. वि. म. शिंदे, श्रीकांत उर्फ दादा शेट्ये यांच्यासह भास्करराव शेट्ये यांनी महत्त्वाचे योगदान देताना आपल्या स्पष्ट बोलण्याच्या भूमिकेने संघटनेच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली . त्यासोबतच न्यायाधीश या नात्याने संस्थेला शिस्त लावण्यात पुढाकार घेतला त्यामुळे त्यांच्या जाण्याने कोकण मराठी साहित्य परिषद पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. यावेळी आलेल्या शोकसंदेशात परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह दूरदर्शनचे जयू भाटकर यांनी दिलेल्या शोकसंदेशाचे वाचन कवी केशवसुत स्मारक मालगुंड अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले . यावेळी उपस्थित असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी आपल्या संदेशातून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त भास्करराव शेट्ये यांच्या कार्याच्या अनेक आठवणींना उजळा देत, त्यांचे विचार भविष्यात दिशादर्शक ठरतील असे सांगितले. यासोबतच उपस्थित असणारे कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे , चंद्रमोहन देसाई, नितीन कानविंदे, रवींद्र मेहेंदळे, एडवोकेट सुवर्णा आंबुलकर, नलिनी खेर यांच्यासह अनेक उपस्थितांनी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष भास्कर राव शेटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगत श्रद्धांजली अर्पण केली. या श्रद्धांजली कार्यक्रमाला जुने सहकारी अरुण नेरुरकर, रत्नागिरी जिल्हा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष उन्मेश शिंदे , न्यूज 24 तासचेसंपादक एडवोकेट सुनील चव्हाण, मालगुंड शाखेचे सचिव उमेश बनसोडे, कोमसाप मालगुंड शाखेचे खजिनदार विद्याधर तांदळे , कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरुण मोरे , कोमसाप परिवारातील ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर , स्मिता बापट , मालगुंड युवाशक्तीचे अमेय धोपटकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. शशांक पाटील, ग्रंथपाल श्रुती केळकर, त्रिवेणी थूळ, गीता मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये यांचे हितचिंतक उपस्थित होते . सभेच्या शेवटी माजी न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये यांच्यासह ज्येष्ठ नाटककार कथाकार कोमसापच्या रौप्य महोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनाही दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .