मुंबई(गुरुनाथ भोईर):* रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी रस्ता या सागरी महामार्गाचे प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिलेली आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सागरी महामार्गासाठी तयार करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालात सागरी महामार्गाशी संलग्न असलेल्या मांडवा ते अलिबाग,सारळ-कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी समावेश करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे,अशी माहिती राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माध्यमांना दिली.रायगड जिल्ह्यातील पर्यटनासाठी लोकप्रिय अशा अलिबाग येथे जाणाऱ्या पर्यटकांना दळणवळणाची उत्तम सुविधा मिळावी,यासाठी या संलग्न रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सागरी महामार्गाच्या प्रकल्प अहवालात समावेश करण्याबाबत पालकमंत्री कु. तटकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांना विनंती केली होती. त्यानुसार या रस्त्यांच्या अद्ययावतीकरण व सुधारणाकरिता त्याचा सागरी महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यामध्ये समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.राज्य शासनाने रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती केली आहे.गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली जलवाहतूक सुविधा व प्रस्तावित रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग यामुळे दळणवळणाची सुविधा सुलभ होत आहे.मात्र मांडवा ते अलिबाग दरम्यान सुलभ दळणवळणासाठी मांडवा ते अलिबाग,सारळ ते कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांची सुधारणा करणे आवश्यक आहे.या रस्त्यांचे अद्ययावतीकरण व सुधारणा करण्यासाठी प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तयार करण्यात येणार आहे.यामुळे रायगड जिल्ह्यात मुंबईतून गेटवे मार्गाने जलवाहतूकीने अलिबाग येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांचा या मार्गाने प्रवास सुलभ होण्यास मदत होणार आहे.पर्यटनसाठी आवडीचे ठिकाण असलेल्या अलिबाग येथील व सभोवतालच्या समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना प्रवासाचा उत्तम आनंद या मार्गांच्या विकासातून घेता येणे शक्य होणार आहे.जिल्ह्यातील पर्यटक वाढीसह रोजगार निर्मितीस फलदायी ठरणाऱ्या मांडवा ते अलिबाग,सारळ ते कार्लेखिंड व कार्लेखिंड ते थळ या रस्त्यांचा समावेश सागरी महामार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये होत असल्याने,पालकमंत्री कु. तटकरे यांनी रायगड जिल्हावासीच्यावतीने राज्याचे मा.उपमुख्यमंत्री मा. ना.श्री.अजितदादा पवार यांचे आभार मानले.या रस्त्यांच्या विकासातून रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास नक्कीच हातभार लागेल,असा विश्वास पालकमंत्री कु.तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.