रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. आरोपीने महिलेची ओळख पटू नये म्हणून तिचं डोकं धडावेगळं केलं आणि हातावरील गोंदवलेलं नावही मिटवलं. यामुळे या हत्येच्या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान होतं. मात्र, रायगड पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत २४ तासात या हत्येच्या प्रकरणाची उकल केली आहे. तपासात पतीकडूनच या महिलेची निघृण हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना आरोपीला जेरबंद करण्यातही यश आले आहे.
रविवारी (१२ डिसेंबर) सकाळी माथेरान येथील इंदिरा नगर परिसरात एका खासगी लॉजमध्ये शीर नसलेला निर्वस्त्र मृतदेह आढळून आला. त्यामुळे माथेरान परिसरात खळबळ उडाली. अतिशय कृरपणे या महिलेची हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून शीर धडापासून वेगळे करण्यात आले होते. महिलेच्या हातावर गोंदलेले नावही नष्ट करण्यात आले होते. निर्वस्र अवस्थेत मृतदेह टाकून आरोपी फरार झाला होता.
या गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीचा शोध घेणे या दोन पातळ्यांवर पोलिसांना काम करावे लागणार होते. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ८ पथकांच्या मदतीने पोलीस तपास सुरु करण्यात आला.
सुरवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी लॉजमध्ये राहायला आलेल्या जोडप्याचे फोटो मिळवले. त्यानंतर पुढील तपास सुरु केला. तपासा दरम्यान घटना स्थळापासून काही अंतरावर झुडपात एक बँग आढळून आली. या बॅगमध्ये गोरेगावचा पत्ता असलेली दवाखान्याची एक चिठ्ठी सापडली. यानंतर पोलिसांनी गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेव्हा गोरेगाव येथून पूनम पाल ही महिला बेपत्ता असल्याचे समोर आले.
बेपत्ता महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली. मात्र, परत घरी आलीच नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपासाला दिशा मिळाली. शीर नसलेला मृतदेह तिचाच असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती हा तिचा नवराच असल्याचेही समोर आले. त्यामुळे त्याचा शोध पोलीसांनी सुरु केला.
तपासाची चक्र फिरवून आरोपी पतीला पनवेल येथून ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी राम पाल याला अटक केली आहे. या पुढील तपास सुरु आहे. मनाविरुध्द लग्न लाऊन दिल्याने हत्या केल्याचं कारण आरोपीने सांगितले. गुन्ह्यातील आरोपी हा उच्च शिक्षित तरुण आहे. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याचे मे महिन्यात पीडित महिलेशी लग्न झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून तो सतत तिच्यावर संशय घेत होता.
तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह कर्जत, नेरळ, खालापूर, माथेरान पोलिसांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली. माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तपास कौशल्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आम्ही आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.