• उन्मेष गुजराथ
उरणउरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी चक्क खोटे वारस दाखले बनवले. या खोट्या, बनावट दाखल्याच्या आधारे ट्रस्टच्या नावे असलेली म्हातवली (उरण तालुका, रायगड जिल्हा ) येथील जमीन डोसू भिवंडीवाला यांच्या नावे केली. ही २० एकर जमीन १६ कोटी ४५ लाख रुपयांना विकली. त्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. या बेकायदेशीर व्यवहारातील जमीन खरेदी केल्याप्रकरणी भाजपचे आमदारही गोत्यात आलेले आहे.
उरण : खान बहादूर होरमसजी मानेकजी ट्रस्ट हा मुंबईतील नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या ट्रस्टची स्थापना १९१९ साली झाली. त्यानंतर १९५० साली बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अस्तित्वात आल्यानंतर त्याची कायदेशीर नोंदणी झाली. या ट्रस्टच्या नावावर नवी मुंबईत शेकडो एकर जमिनी आहेत. यातील बहुतेक जागा सिडकोच्या कार्यक्षेत्रात आहेत. या जमिनींची जमिनीची किंमत आज कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. जागेतून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या लालसेने या ट्रस्टमधील डोसू भिवंडीवाला या एका सदस्याने गोडे यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनविली व ट्रस्टचे नाव जमिनीच्या नोंदीवरून हटवले. यात रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील म्हातवली गावातील जमीन सुमारे २२ एकर होती. याची किंमत आजमितीला ७० कोटी रुपयांहून अधिक आहे. मात्र ती उरणचे आमदार महेश बालदी यांनी केवळ १६ कोटी ४५ लाखांना खरेदी केली. २०१८ साली हा व्यवहार झाला. हा व्यवहार सपशेल बेकायदेशीर आहे, असा आरोप करीत या ट्रस्टच्या प्रतिनिधी फरीदा दुभाष यांनी याविरोधात मुंबईतील एल टी मार्ग येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास चालू आहे, मात्र बालदी व गोडे यांच्या दबावामुळे यातील पुढील चौकशीच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण होत आहे. बालदी यांनी जमीन नावावर करून घेतली मात्र या व्यवहारात ठरलेली रक्कम म्हणजेच १६ कोटी ४५ लाख रुपये प्रत्यक्षात अद्याप दिलीच नाही, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांनी उर्मिश उदाणी, डोसू भिवंडीवाला, तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे, आमदार महेश बालदी व संबांधितांवर भारतीय दंड संविधान ४०६, ४०९, ४१८, ४२०, ४२३, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० (ब ), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.