एका गाईनं चुकून सोनसाखळी गिळल्याची एक घटना घडली होती. श्रीकांत हेगडे आणि कुटुंबीय उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्याच्या हिपनहल्ली येथे राहतात. या कुटुंबाकडे ४ वर्षांची गाय आणि एक वासरू आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला, गोपूजन समारंभात कुटुंबाने गाय आणि वासराला स्नान घालून पूजा केली.
या भागात लोक गाईची पुजा करतात. गाईला हार आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवलं जातं. काही लोक गायीला लक्ष्मीचं रुप मानतात. त्यामुळं ते गायींना सोन्याच्या दागिन्यांनी सजवतात, पूजा करतात, त्यांना चांगले पदार्थ खाऊ घालतात आणि नंतर दागिने परत घेतात. परंपरेप्रमाणे हेगडे कुटुंबीयांनी देखील वासराच्या गळ्यात २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी घातली होती. नंतर त्यांनी साखळी काढून फुलं व इतर वस्तू गायीसमोर ठेवल्या. यामध्ये ती साखळी देखील होती. पुढच्या अगदी काही मिनिटांत सोनसाखळी गायब झाली. घरच्यांनी सगळीकडे साखळी शोधायला सुरुवात केली. मात्र, शोधूनही न सापडल्याने गायीने साखळी गिळली असावी, असा संशय कुटुंबीयांना आला.
या घटनेपासून पुढचे ३०-३५ दिवस रोज हेगडे कुटुंबीयांनी गाय आणि वासराच्या शेणात साखळीचा शोध घेतला. परंतु साखळी न मिळाल्याने निराश झालेल्या कुटुंबीयांनी शेवटी पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घेतली. डॉक्टरांनी मेटल डिटेक्टर वापरून गायीच्या पोटात साखळी आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर गाईच्या पोटात साखळी नेमकी कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी स्कॅन केले.
त्यानंतर गायीवर शस्त्रक्रिया करून सोन्याची साखळी काढण्यात आली. सोनसाखळी काढल्यानंतर त्याचं वजन केलं असता ते फक्त १८ ग्रॅम निघालं. तसेच साखळी मोडलेली देखील आहे. त्यामुळे २ ग्रॅम सोनं गहाळ जरी झालं असलं तरी साखळी परत मिळाल्याचा आनंद कुटुंबीयांना झाला आहे.