प्राणी वस्तीत शिरले की घाबरगुंडी उडतेचं. नुकतीच तमिळनाडूतील तिरुपूरमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली. येथे एका बिबट्याने रहिवासी भागात प्रवेश केल्याने स्थानिक लोक घाबरले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याला पकडले. या बचावादरम्यान एक वन अधिकारी देखील जखमी झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्याने अचानक वनअधिकाऱ्यावर कसा हल्ला केला हे स्पष्ट दिसत आहे. माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी शेतकरी शेतात काम करत असताना बिबट्या दिसला होता, मात्र त्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने दोन शेतकऱ्यांसह ७ जणांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. लोकांना पाहून बिबट्याही चांगलाच घाबरला. अशा स्थितीत समोरून येणाऱ्यावर तो हल्ला करत होता.
बिबट्याची दहशत पाहून वनविभागाच्या पथकाने तात्काळ कारवाई केली.त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. सर्वप्रथम बिबट्याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले. त्यानंतर बिबट्या दिसल्यावर त्याच्यावर बेशुद्ध करायची गोळी झाडण्यात आली, त्याच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले.अनामलाई व्याघ्र प्रकल्पात बिबट्याला सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. अम्मापालयमजवळ बिबट्याचा माग काढण्यात आला, तिथे बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर हल्ला केला.