दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्रीदत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 18 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी श्री दत्तात्रय जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती म्हणजेच दत्तात्रय प्रभू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा ते अवतार मानले जातात. तर श्री दत्त प्रभू हे विष्णुचा सहावा अवतार आहे. विशेष म्हणजे दत्तात्रेय प्रभू सर्वधर्मीय देवता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. श्रीदत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
श्री दत्तात्रय प्रभू हे ऋषी अत्री आणि अनसूया यांचे पुत्र. सद्गुणी स्त्रियांमध्ये अनसूया देवीला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. वनवासात असताना माता सीतेने देखील अनसूया देवीचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याकडूनच पवित्र हिंदू धर्माचे शिक्षण घेतले होते. श्री दत्तात्रय प्रभू तात्काळ कृपाळू, भक्तवत्सल आहेत. भक्ताच्या हाकेला ते धावून जातात.
सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग पसरतो आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patient in India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत तुम्ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या प्रियजणांना श्री दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा पाठवून आजचा दिवस आणखी मंगलमय करू शकतात.
दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी भक्त श्री दत्तात्रेयांची गुरु आणि देव म्हणून पूजा आणि प्रार्थना करतात. श्री दत्तात्रेय भगवानांची उपासना व आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते.दत्तात्रेयांच्या कृपेने मनुष्याला खरे ज्ञान प्राप्त होते. जीवनातील ध्येय साध्य करण्याची शक्ती भगवान श्री दत्तात्रेयजींच्या कृपेने मिळते. श्री दत्तात्रेयांच्या कृपेने माणसाचे भय संपते, आत्म्याला मोक्ष मिळतो, माणसाला सर्व दुःखांपासून मुक्ती आणि मन:शांती मिळते.